ब्युरो न्यूज | सुरेश बापार्डेकर :
‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत १५ जुलै ते ३० सप्टेंबर (७५ दिवस) या कालावधीत १८ वर्षावरील सर्व नागरीकांना कोविड लशीची वर्धित मात्रा शासकीय लसीकरण केंद्रावर मोफत देण्यात येत आहे. देशभरात ‘कोविड लसीकरण अमृत महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. कोरोनाचा धोका अद्यापही पुर्णत: टळलेला नसल्याने या विषाणूच्या प्रतिबंधासाठी वर्धित मात्रा अत्यंत महत्वाची ठरणार आहे.
राज्यात कोविड लसीकरण मोहिमेला १६ जानेवारी २०२१ पासून प्रारंभ झाला. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार कोविड लसीकरण मोहिमेची राज्यात अंमलबजावणी सुरू आहे. आरोग्य कर्मचारी आणि कोरोना योद्धे (फ्रंट लाईन वर्कर) यांच्या लसीकरणाने मोहिमेची सुरुवात झाली. १ एप्रिल २०२१ पासून ४५ वर्षे व त्यावरील सर्व नागरीकांचा लसीकरण मोहिमेत समावेश करण्यात आला, तर १ मे २०२१ पासून १८ ते ४४ वर्षे वयोगटाचा कोविड लसीकरणामध्ये समावेश करण्यात आला. केंद्र शासनाच्या सुधारीत मार्गदर्शक सुचनानुसार २१ जून २०२१ पासून केंद्र शासनाकडून १८ वर्षे ते पुढील वयोगटाकरीता लस पुरविण्यात येत आहे.
कोविड वर्धित मात्रा महत्वाची
१० जानेवारी २०२२ पासून आरोग्य कर्मeचारी, कोरोना योद्धे (फ्रंट लाईन वर्कर) व ६० वर्षावरील सहव्याधी असलेल्या नागरीकांना वर्धित मात्रा देण्यास सुरुवात झाली. ज्या नागरीकांनी दुसरा डोस घेतल्यानंतर ३८ आठवडे अथवा ९ महिने पूर्ण केले असतील अशाच व्यक्तींना ही मात्रा देण्यास सुरुवात झाली. पहिली व दुसरी मात्रा ज्या लशीची घेतली त्याच लशीची वर्धित मात्रा घ्यायची आहे. कोरोना प्रतिबंधासाठी वर्धित मात्रा महत्वाची आहे.
वर्धित मात्रा घेण्याच्या कालावधीत बदल
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार १२ ते १७ वर्षे वयोगटासाठी कोव्होवॅक्स लस वापरास परवानगी देण्यात आली आहे. लस खाजगी केंद्रावर उपलब्ध आहे. १५ ते १७ वर्षे वयोगटासाठी कॉरबीव्हॅक्स लशीचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली असून ही लस या वयोगटासाठी खाजगी केंद्रावरच घेता येणार आहे. स्पुटनिक लशीची वर्धित मात्रा देण्यास मान्यता देण्यात आली आहे. १३ मे २०२२ पासून आंतरराष्ट्रीय प्रवाशी व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत परदेशात सहभागी होणारे खेळाडू, आंतरराष्ट्रीय बैठकांमध्ये सहभागी होणारे अधिकारी यांच्यासाठी वर्धित मात्रेचा कालावधी कमी करण्यात येऊन तो ९० दिवसांचा करण्यात आला आहे. ६ जुलै २०२२ पासून वर्धित मात्रा घेण्यासाठीचा कालावधीत ९ महिन्यावरुन ६ महिने किंवा २६ आठवडे पूर्ण करण्यात आला आहे.
कोविड लसीकरणाचे ७५ दिवस
१५ जुलै २०२२ पासून ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत १५ जुलै ते ३० सप्टेंबर २०२२ (७५ दिवस) या कालावधीत १८ वर्षावरील सर्व नागरीकांना वर्धित मात्रा शासकीय लसीकरण केंद्रावर मोफत दिली जात आहे. १२ ऑगस्ट २०२२ पासून कॉरबीव्हॅक्स लशीचा वर्धित मात्रेसाठी वापर करण्यास केंद्र शासनाने सूचना दिल्या आहेत. आझादी का अमृतमहोत्सव अभियान अंतर्गत १३ ऑगस्ट २०२२ पर्यंत ३ लाख ४४ हजार ५८५ नागरिकांना पाहिली, ७ लाख १३ हजार ५४४ नागरिकांना दुसरी, तर ३१ लाख ९३ हजार ११ नागरिकांना वर्धित मात्रा देण्यात आली आहे.
कोविड लसीकरणासाठी विशेष सत्र
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार ज्या लाभार्थ्यांकडे ओळखपत्र नाही असे जेलमधील कैदी, भटक्या जमाती, मनोरुग्ण संस्थेतील लाभार्थी, भिकारी, वृद्धाश्रमातील लाभार्थी, रस्त्यालगत राहणारे, पुर्नवसन शिबिरात राहणारे इत्यादीसाठी कोविड लसीकरण विशेष सत्र आयोजित करुन लसीकरण केले जाते.
१५ ते १८ वर्ष वयोगटासाठी कोव्हॅक्सिन लस
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार स्तनदा मातांकरीता आणि गरोदर महिलांकरीता जुलै २०२१ पासून लसीकरण सुरु करण्यात आले आहे. जागेवरुन हालचाल न करता येणाऱ्या व्यक्तींकरीता जुलै २०२१ पासून कोविड लसीकरण करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थ्यांना तिसऱ्या लाटेतील विषाणूच्या संसर्गाची शक्यता लक्षात घेता ३ जानेवारी २०२२ पासून १५ वर्षावरील लाभार्थ्यांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. १५ ते १८ वर्ष वयोगटासाठी कोव्हॅक्सिन लसीचा वापर करण्यात येत आहे. या लसीकरणामुळे शाळा सुरळीतपणे सुरू राहण्यास मदत झाली आहे.
१२ पूर्ण ते १४ वर्ष वयोगटासाठी कॉरबीव्हॅक्स लसीचा वापर
१६ मार्च २०२२ पासून १२ वर्ष व त्यावरील सर्वांचे लसीकरण सुरु करण्यात आले. वय वर्ष १२ पूर्ण ते १४ वर्ष या वयोगटासाठी कॉरबीव्हॅक्स लशीचा वापर करण्यात येत आहे. तसेच ६० वर्षावरील सर्व नागरीकांना वर्धित मात्रा देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. १८ ते ५९ वयोगटातील नागरीकांना केंद्रामार्फतदेखील वर्धित मात्रा देण्यात येत आहे.
गृहभेटीद्वारे (हर घर दस्तक) शंभर टक्के लसीकरणाचे प्रयत्न
•कोविड १९ लसीकरण कमी असलेली गावे, तालुके, वॉर्ड याबाबत माहिती संकलीत करुन प्राधान्याने त्या गावातील लसीकरण सत्रांचे आयोजन.
• जिल्हा, मनपा तसेच तालुकास्तरावर टास्क फोर्स बैठकांचे आयोजन
•सुक्ष्मकृती नियोजन आराखड्याच्या मदतीने लसीकरण सत्रांचे आयोजन व अंमलबजावणी
• लसीकरण सत्रांची संख्या वाढविण्यासोबतच लाभार्थ्यांना सोईच्यावेळी सत्रांचे आयोजन
•कोविन प्रणालीचा सहाय्याने ड्यूलिस्टचा वापर (दुसरा डोस राहिलेल्या लाभार्थ्यांची यादी) करुन प्रत्यक्ष किंवा दूरध्वनीद्वारे पाठपुरावा
•’हर घर दस्तक’ अभियानांतर्गत घरोघरी जाऊन लसीकरण झालेल्या व्यक्तीची माहिती घेत लसीकरण राहिलेल्या व्यक्तींचा पाठपुरावा. लाभार्थ्यांना लसीकरण सत्राच्या ठिकाणी नेण्यासाठी वाहतूक व्यवस्था
•व्यापक प्रमाणात लसीकरणाबाबत जनजागृती तसेच इतर विभागांचा लसीकरणात सक्रिय सहभाग.
मिशन कवच कुंडल
राज्यात ८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत विशेष कोविड लसीकरणासाठी ‘मिशन कवच कुंडल’ मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेसाठी गावांगावांमध्ये तसेच शहरी भागात लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. लसीकरणाच्या दिवशी लाभार्थीना बोलविण्यासाठी गावातील स्वयंसेवक, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी कार्यकर्ती यांना जबाबदारी देण्यात आली. ८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत या मोहिमेच्या माध्यमातून नागरीकांना १ कोटी २३ लाख मात्रा देण्यात आल्या.
मिशन युवा स्वास्थ अभियान
सार्वजनिक आरोग्य विभाग व उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत ‘मिशन युवा स्वास्थ’ उपक्रम सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे कोविड १९ लसीकरण सत्र राबविण्यात आले.या दरम्यान राज्यात एकूण २३२ महाविद्यालयांमध्ये २ हजार ५८० लसीकरण सत्र आयोजित करुन विद्यार्थ्यांना १ लाख ८ हजार मात्रा देण्यात आल्या.
हर घर दस्तक अभियान
• ‘हर घर दस्तक’ अभियान ८ नोव्हेंबर २०२१ ते जानेवारी २०२२ अखेर संपूर्ण राज्यात राबविण्यात आले. १८ वर्षे व त्यावरील वयोगटातील लाभार्थ्यांचे पहिला डोस शंभर टक्के पूर्ण लसीकरण होईल याचे नियोजन करण्यात आले. ज्या नागरिकांचा लसीकरणाचा पहिला तसेच दुसरा डोस राहिला आहे, अशा नागरिकांना या मोहिमेअंतर्गत घरोघरी जावून आरोग्य कर्मचाऱ्यांद्वारे कोविड १९ लसीकरणाची माहिती देण्यात आली व त्यांचे प्राधान्याने लसीकरण करण्यासाठी प्रवृत्त करण्यात येऊन नजीकच्या लसीकरण केंद्रात लसीकरण करण्यात आले. हर दस्तक या अभियानात ८ नोव्हेंबर २०२१ ते जानेवारी २०२२ अखेर ७१ लाख ६१ हजार ५४९ पहिली मात्रा आणि ८५ लाख २५ हजार ८५१ नागरिकांना दुसरी मात्रा देण्यात आली.
हर घर दस्तक अभियान २.०
हर घर दस्तक अभियान २.० हे १ जून ते ३१ जुलै २०२२ या कालावधीत राबविण्यात आले. १२ ते १८ वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यासोबतच तुरुंगातील कैद्याचे कोविड लसीकरण आणि ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरीकांना वर्धित मात्रा मोहिमेअंतर्गत घरोघरी जावून आरोग्य कर्मचाऱ्यांद्वारे कोविड १९ लसीकरणाची माहिती घेण्यात आली. प्राधान्याने लसीकरण करण्यासाठी प्रवृत्त करण्यात येऊन घरीच किंवा नजीकच्या लसीकरण केंद्रात लसीकरण करण्यात आले. १२ ते १८ वयोगटास पहिली मात्रा ३ लाख ३२ हजार ६४०, दुसरी मात्रा – ४ लाख २१ हजार ७४ तर १८ वर्षावरील दुसरी मात्रा ९ लाख २७ हजार ७७७, ६० वर्षावरील वर्धित मात्रा ९ लाख ९५, हजार १३९ नागरिकांना देण्यात आली.
लसीकरणाची आकडेवारी दृष्टिक्षेपात
आरोग्य कर्मचारी -१२ लाख ९५ हजार ६८८ पाहिली मात्रा, ११ लाख ९५ हजार ७२ दुसरी मात्रा तर ५ लाख १ हजार २५७ कर्मचाऱ्यांना वर्धित मात्रा देण्यात आली.
फ्रंट लाईन वर्कर-२१ लाख ५० हजार २६६ पहिली मात्रा, २० लाख १० हजार ८२९ दुसरी मात्रा तर ७ लाख ७३ हजार २ फ्रंट लाईन वर्करना वर्धित मात्रा देण्यात आली.
१२ ते १७ वर्षे वयोगटामध्ये ६८ लाख १३ हजार ३१० पहिली मात्रा, ४६ लाख ३७ हजार ८४४ मुलांनी दुसरी मात्रा घेतली आहे.
१८ ते ५९ वर्षे वयोगटात ६ कोटी ७७ लाख ४३ हजार ६९ नागरिकांनी पहिली मात्रा, ५६ कोटी ५ लाख १६ हजार ६८० नागरिकांनी दुसरी तर ३३ लाख ५४ हजार ३७७ नागरिकांनी वर्धित मात्रा घेतली.
६० वर्षे व त्यावरील नागरिक या गटात १ कोटी ३३ लाख ८९ हजार ७२१ नागरिकांनी पहिली, ११ कोटी ५ लाख, ३१ हजार १८ नागरिकांनी दुसरी तर २७ लाख ११ हजार १४० नागरिकांनी वर्धित मात्रा घेतल्याची नोंद आहे.
लसीकरणामध्ये हेल्थ वर्कर ४२ टक्के, फ्रंट लाईन वर्कर ३९ टक्के, १८ ते ५९ वर्षे वयोगट ७ टक्के, ६० वर्षे व त्यावरील नागरिक २७ टक्के नागरिकांनी प्रिकॉशन डोस घेतला आहे.
डॉ.सचिन देसाई-महाराष्ट्र राज्य लसीकरण अधिकारी-कोरोना नियंत्रणासाठी सर्व नागरिकांचे लसीकरण होणे आणि दोन्ही मात्रा घेतलेल्यांनी लशीची वर्धित मात्रा घेणे आवश्यक आहे. कोरोना नियंत्रणासाठी नागरिकांनी प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेस चांगले सहकार्य केले आहे. कोरोना रुग्णसंख्या कमी झाली असली तरी गाफील राहून चालणार नाही. कोविड लसीकरणाच्या अमृत महोत्सवात सहभागी होऊन लशीची वर्धित मात्रा घेऊन कोरोनावर पूर्णपणे मात करुया.!