कट्टा । प्रतिनिधी : महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांची जयंती शेतकरी दिन म्हणून मालवण तालुक्यातील कट्टा गुरामवाडी येथील प्रगतशील शेतकरी शेखर कुडाळकर यांच्या निवासस्थानी जि. प. सदस्य संतोष साठविलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. जिल्ह्यातील तज्ञ मार्गदर्शक प्रताप सलगर यांनी शेतीसाठी सेंद्रिय खतांचा योग्य वापर, खत तयार करण्याची पद्धत, सेंद्रिय खतांचे होणारे फायदे यावर मार्गदर्शन केले. प. स. मालवणचे विस्तार अधिकारी श्री. जाधव यांनी गांडूळ युनिट व गांडूळ खत निर्मिती याबाबत मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी श्री गोसावी यांनी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्याबाबत माहिती दिली तर कृषी सहाय्यक सौंगडे यांनी डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांचा जीवनपट व कृषी विभागातील त्यांचे उल्लेखनीय कार्य यांची माहिती दिली. प्रमुख उपस्थित असलेले जि. प. सदस्य संतोष साठविलकर यांनी कृषी विभागाला शुभेच्छा देत असे कार्यक्रम वारंवार होणे गरजेचे आहे. जेणेकरून शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर पडून सेंद्रिय खतांचा वापर करून तांत्रिकदृष्ट्या शेती करण्यास मदत होईल असे मत व्यक्त केले. यावेळी उपस्थित महिलांना शेतीशाळा प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी श्री. गोसावी, एस. जी. परब, डी. डी. गावडे, एम्. बी. कदम, श्री. धुरी, विस्तार अधिकारी मालवण श्री. पाताडे, श्री. जाधव, उपसरपंच मकरंद सावंत, ग्रामसेवक पी. डी. सरमळकर, ग्रा. प सदस्य रुपाली परुळेकर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेखर कुडाळकर, विजय गोठणकर, विराज गोठणकर यांनी सहकार्य केले. आभार कृषी सेवक श्री. सौंगडे यांनी मानले.