बांदा | राकेश परब :
इंग्रजी माध्यमाची शाळा असूनही आपल्या परंपरा अन संस्कृती जपणारी, सुसंस्कारांचे बाळकडू पाजणारी शाळा म्हणून नाबर प्रशाला आपली एक वेगळीच ओळख राखून आहे. आषाढी एकादशीचे औचित्य साधून श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबईच्या व्ही. एन. नाबर प्रशालेने दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील शनिवार दिनांक 9 जुलै रोजी दिंडीचे आयोजन केले .विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशभूषा साकारल्या. डोक्यावर तुळशी वृंदावन ,टाळ, मृदुंगाच्या गजरात ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ‘हा नामजप करत नाबरच्या बालचमुंनी अवघी बांदा नगरी दुमदुमवली.
श्री विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा उपस्थितांमध्ये लक्षवेधी ठरली. विद्यार्थ्यांनी झाडे लावा,झाडे जगवा, स्वच्छता पाळा, प्रदूषण टाळा, प्लास्टिक बंदी यांसारख्या विषयांवर घोषवाक्यांद्वारे जनजागृतीपर संदेश दिला.
विद्यार्थी व शिक्षक यांनी बांदा येथील विठ्ठल मंदिरात श्री विठ्ठल व राखुमाईचे दर्शन घेतले. नाबरच्या छोट्या भजनी कलाकारांनी आपल्या सुरेल आवाजात विठ्ठलाची भजने गात सर्वांना मंत्रमुग्ध केले. परंपरा व जनजागृती यांचा समन्वय साधत सादर केलेल्या व्ही. एन. नाबरच्या दिंडीचे सर्व उपस्थितांनी, बांदा वासीयांनी कौतुक केले.