मुसळधार घनगर्जत धो धो…! (कवयित्री: वैशाली पंडित,सिंधुदुर्ग )
मुसळधार घनगर्जत धो धो,
त्यातच वारा सैरावैरा…
झाड सोडीना एकही हातून,
मुळापासूनी हलत पसारा.
उघडी खिडकी मिटून घेते,
या मस्तीशी राही फटकून..
शिरजोरीची कमाल झाली,
तरीही वारा घुसतो त्यातून.
सोडुन झिंज्या यावी गर्गशा…
पिसाळल्या या पाऊसधारा,
त्यात भरीला छपरावरचा,
वाजत सुटला धुंद नगारा.
रस्त्यांच्या छातीवर फुगडी,
सीमा नाही धिंगाण्याला…
कोसळ कोसळ घुसळण चाले,
जोष फुसांडत अन् पाण्याला.
इथले तिथले भेटत खेटत,
परस्परांशी पाणी भिडते…
चिंब होऊनी निथळत खिदळत,
सकाळ अवखळ दारी येते !
© वैशाली पंडित