बॉम्बे ब्लडग्रुपचे ओरोस मध्ये रक्तसंकलन….!
वैभववाडी | नवलराज काळे :
आज ५ जुलै रोजी नांदोस, तालुका मालवण येथील बाँबे ब्लड ग्रुपचे सदस्य श्री राजाराम गोविंद गावडे(वय ६६) यांना हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे डायलिसिससाठी अतिदुर्मिळ अशा बाॅबे ब्लड ग्रुपच्या रक्ताची पुन्हा एकदा गरज होती.
या केससाठी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे सदस्य आणि बॉम्बे ब्लडग्रुप रक्तदाते श्री पंकज गावडे (मालवण) यांनी आज दिनांक ५ जुलै रोजी वेळात वेळ काढून बाहेर मुसळधार पाऊस असताना देखील ओरोस रक्तपेढी येथे सर्वात अतिदुर्मिळ रक्तगटाचे रक्तदान केले. यावेळी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे कुडाळ-वेंगुर्ला विभागीय संघटक श्री यशवंत गावडे आणि जिल्हा रक्तपेढीचा स्टाफ उपस्थित होता.
यापूर्वी दि. ८ फेब्रुवारी रोजी डायलिसिससाठी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे सदस्य सुधीर कांबळी यांनी ओरोस जिल्हा रुग्णालय रक्तपेढीत रक्तदान केले होते. सदर रुग्णासाठी आतापर्यंत सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून ५ वेळा बॉम्बे रक्तगटाचे रक्त उपलब्ध केले गेले आहे.
बाँबे ब्लड ग्रुप हा जगाच्या लोकसंख्येत १० लाख लोकांत फक्त ४ जणांचाच असतो, त्यामुळे तो अत्यंत दुर्मिळ असाच आहे, तरिही सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता पर्यंत सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून व रक्तपेढींच्या सहकार्याने तब्बल ४ रक्तदाते या गटाचे मालवण तालुक्यात सापडले आहेत, तसेच मालवणात या चारांसह एकूण ७ लोक या रक्तगटाचे सापडले आहेत आणि जिल्ह्यात एकूण १६ ची नोंद झाली आहे, म्हणजेच आपल्या जिल्ह्यात या गटाची संख्या वाढत आहे, त्यातही मालवण तालुका या गटाने सधन असल्याचे समजतेय.
या केसच्या पूर्ततेसाठी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री प्रकाश तेंडोलकर, सचिव किशोर नाचणोलकर यांनी प्रयत्न केले.