मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब गांवच्या ग्रामपंचायतचे सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी आज मालवण पंचायत समितीमध्ये येत गटशिक्षणाधिकारी श्री. माने यांची भेट घेतली.
जिल्ह्यात तुफानी पावसाचा ऑरेंज अलर्ट असूनही सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी गावातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ मध्ये पदवीधर शिक्षकाच्या मागणीसाठी गटशिक्षणाधिकार्यांची भेट घेतली आहे.
जि. प.शाळा क्रमांक १ ला पदवीधर शिक्षक मिळावा म्हणून प्रदीर्घ काळ गटशिक्षणाधिकारी व संबंधीत यंत्रणांकडे यथाशक्ती पाठपुरावा करुनही अजून पळसंब जि.प.शाळा क्रमांक १ ला कोणताच पदवीधर शिक्षक हजर झालेला नसून त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांमध्येही संतापाचे वातावरण असल्याचे पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी स्पष्ट केले आहे.
गटशिक्षणाधिकारी श्री.माने यांनी आता या संदर्भात पुन्हा बैठक घेऊन त्यावर उपाययोजना केली जाईल असे सांगितले आहे परंतु तत्काळ तसे न झाल्यास नाईलाजास्तव शाळा बंदचा निर्णय घेण्याचा इशाराही सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी दिला आहे. कोरोनाकाळात या पदवीधर शिक्षकाच्या मागणीला विलंब झाला ते आपण समजू शकतो परंतु आता ही मागणी पूर्ण होत नाही याचे नेमके कारण आपल्याला विस्तृतपणे कळले नसल्याचेही सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी सांगितले. दूरध्वनी,पत्रव्यवहार व प्रत्यक्ष भेटी घेऊनही ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी,ग्रामस्थ व जि.प. शाळेकडे होणारे हे दुर्लक्ष विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी घातक असल्याची खंत सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी व्यक्त केली आहे.