दहावीच्या परीक्षेत सलग अठरा वर्षे शंभर टक्के यशाची परंपरा..
मालवण | नझ़िरा शेख़: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या रोझरी इंग्लिश स्कूल या शाळेचा माध्यमिक शालांत परीक्षेत १००% निकाल लागला. गेली सलग १८ वर्षांची १००% निकालाची परंपरा जपत यंदाही परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी निर्भेळ यश संपादन केले.

या परीक्षेसाठी एकूण ७९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ६५ विद्यार्थी विशेष श्रेणीमध्ये व १४ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले.
कु. इश्वरी उदय बागवे हिने ९५.६०% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आणि ती मालवण तालुक्यात तृतीय, तर कु. भूमी संदिप देऊलकर, कु. तनिषा अनिल गांवकर, कु. आर्या मच्छिंद्र गवारे हीने ९४.६०% गुण मिळवत संयुक्तरित्या द्वितीय क्रमांक पटकावला.
कु. प्रथमेश नितिन आचरेकर या विद्यार्थ्याने ९३.८०% गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
या सत्कार समारंभासाठी प्रशालेचे मॅनेजर फा. फ्रांसिस डिसोझा उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यश एका दिवसात संपादन होत नाही, त्यासाठी अथक परिश्रम व मेहनत करावी लागते. भविष्य चांगले घडवायचे असेल तर आपण आपले लक्ष निर्धारित करून त्या दृष्टीने कृतीशील राहिले पाहिजे असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.
शाळेचे मुख्याध्यापक फा. ऑल्विन गोन्सालवीस यांनीही विद्यार्थ्यांना अनेक शुभेच्छा देत त्यांचे कौतुक केले.
यावेळी शाळेचा शिक्षकवृंद व चालू शैक्षणिक वर्षातील दहावीचा विद्यार्थीवर्ग उपस्थित होता. रोझरी इंग्लिश स्कूलच्या सलग अठरा वर्षांच्या या शैक्षणिक व सर्वांगीण जडण घडण व यश याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून प्रशालेची प्रशंसा होत आहे.