मालवण | किरण वाळके (विशेष):
कवी ‘अनिल’ आणि लेखिका ‘कुसुमावती’ ह्यांची कॉलेजमधे असताना ओळख झाली आणि नंतर प्रेमात रूपांतर झाले. त्यांच्या तारुण्याच्या काळात उघडपणे प्रेम करणारे बहुदा हे एकमेव युगुल असेल. जात वेगळी असल्याने त्यांना खूप संघर्ष करावा लागला, पण अखेरीस १९२९साली त्यांचा प्रेमविवाह झाला व कुसुमावती त्यांच्या सहचारिणी बनल्या. खरोखरच ते दोघे made for each other होते. १९६१ साली एका कार्यक्रमाला कवी अनिल गेले होते. परत आल्यावर घराचे दार वाजवले पण काहीच प्रतिसाद आला नाही. अनिलाना वाटले नेहमी सारखी आपली प्रिया रुसून बसली आहे. रात्रभर अनिल बाहेरच थांबले. पण नंतर दरवाजा तोडून आत गेल्यावर त्यांची जीवनसंगीनी चिरनिद्रेत गेली होती. जिच्या सोबतीने आयुष्य काढण्याची शपथ घेतली होती तिचा निष्प्राण देह बघून नशिबी हे काय आलं? या विचाराने अनिल पूर्ण कोसळून गेले.
“अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना।” ही कविता कवी अनिल ह्यांनी कुसुमावतींच्या प्रेताकडे पाहून लिहली आहे. लिहली आहे असं म्हणण्यापेक्षा जगली आहे. कवितेतील कवीचा आक्रोश काळजाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाही.
पण कवी अनिल (आत्माराम रावजी देशपांडे) ह्यांची ही कविता आहे, जी मला मनापासून आवडते.
कवी अनिल यांची पत्नीवियोगावर याहून आर्त कोणी लिहू शकेल असं वाटत नाही… किती संयमित शब्द आहेत. कुठेही आक्रस्ताळेपणा नाही. आकांडतांडव नाही. पत्नीवियोगानंतर कवी अनिल यांनी ही काळजाचा ठाव घेणारी कविता लिहीली.
…तेव्हा अनिलांच्या लेखणीतून शब्द झरझरले ……
अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना
मिटले तसेच ओठ, की पाकळी हले ना ।
समजूत मी करावी, म्हणुनीच तू रुसावे
मी हास सांगताच, रडताहि तू हसावे,
ते आज का नसावे, समजावणी पटे ना
धरीला असा अबोला, की बोल बोलवेना ।
का भावली मिठाची, अश्रूंत होत आहे,
विरणार सागरी ह्या जाणून दूर राहे ?
चाले अटीतटीने, सुटता अढी सुटेना,
मिटवील अंतराला, ऐसी मिठी जुटे ना ।
की गूढ काही डाव, वरचा न हा तरंग,
घेण्यास खोल ठाव, बघण्यास अंतरंग ?
रुसवा असा कसा हा, ज्या आपले कळेना ?
अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना ।
-कवी अनिल
कवि अनिल यांची ही भावस्पर्शी कविता कुमार गंधर्वांनी आपल्या अमृततुल्य स्वरांनी अमर केलीय.
ही कविता जर गीत होणार असेल तर ते केवळ कुमार गंधर्व गातील असा अनिलांचा आग्रह होता आणि तसंच झालं अनिल – कुसुमावातीच हे गीत कुमार गंधर्व यांनी अजरामर केलं!
संग्रह सौजन्य (किरण वाळके,भरड मालवण)