चाचणी झाल्यानंतर उड्डाणपुल पुन्हा बंद..!
कणकवली | उमेश परब :कणकवली शहरातील उड्डाणपूल रस्ता जुलै महिन्यातील अतिवृष्टीमध्ये खचला होता. या खचलेल्या भागाची डागडुजी केल्यांनतर आज उड्डाणपुलाची बंद असलेली लेन चाचणीसाठी खुली करण्यात आली. सुमारे दोन तास वाहने सोडल्यानंतर सायंकाळी उड्डाणपुलाची मुंबई ते गोवा जाणारी लेन पुन्हा बंद करण्यात आली. दरम्यान २५ ऑगस्टपासून नारारण राणेंची जन आशीर्वाद यात्रा सिंधुदुर्गात येणार आहे. त्यावेळी बंद असलेली लेन पुन्हा सुरू केली जाणार असल्याची माहिती दिलीप बिल्डकॉनच्यावतीने देण्यात आली.
कणकवली शहरातील उड्डाणपुलाचे काम पहिल्यापासूनच निकृष्ट दर्जाचे झाले होते. यात गेल्या वर्षी उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळला होता. त्यानंतर उड्डाणपुलाची भिंत देखील दोन वेळा कोसळली होती. त्यानंतर यंदा पुन्हा जुलै महिन्यातील अतिवृष्टी कालावधीत उड्डाणपुला रस्ता खचला. यामुळे गेले महिनाभर मुंबई ते गोवा जाणारी एक लेन बंद ठेवण्यात आली आहे. खचलेल्या रस्त्याची डागडुजी झाल्यानंतर आज दुपार नंतर दोन तास ही लेन वाहनांसाठी खुली करण्यात आली. यात चाचणी झाल्यानंतर सायंकाळी ही लेन पुन्हा बंद करण्यात आली. दरम्यान खचलेल्या लेनची पुन्हा एकदा वाहने सोडून चाचणी केली जाणार आहे. त्यानंतर २५ ऑगस्ट पासून ही लेन वाहतुकीसाठी पूवर्वत केली जाणार असल्याचे दिलीप बिल्डकॉनतर्फे सांगण्यात आले.