प्रसिद्ध उद्योजक डॉक्टर दीपक परब व तज्ञांनी नुकताच केला मॉरीशस दौरा..
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : भारत आणि मॉरिशस देशा अंतर्गत एग्रीकल्चर व्यापार आयात निर्यातीवर अनेक बंधने आहेत ही सर्व बंधने दूर करून भारत आणि मॉरिशसमध्ये एग्रीकल्चर विभागातील व्यवसाय सुरु व्हावा यासाठी मसुरे गावचे सुपुत्र प्रसिद्ध उद्योजक तथा एग्रीकल्चर कमिटी कोकण रिजनचे माजी अध्यक्ष डॉक्टर दीपक परब यांनी नुकताच मॉरिशस देशाचा दौरा केला.
यावेळी त्यांच्या सोबत मुंबई येथील प्रसिद्ध उद्योजिका आणि आर एस इंटरप्राईजेस आणि कोकण ऍग्रोच्या सौ. राधिका परब, आरोग्यम् ऍग्रो फूडच्या अनुराधा दळवी, उद्योजक डॉक्टर दीपक दळवी उपस्थित होते. सहा दिवसांच्या मॉरीशस दौऱ्यादरम्यान मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंदकुमार जगनाथ, परराष्ट्रमंत्री ॲलन गनु, मॉरिशस चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज जनरल सेक्रेटरी युसुफ इस्माईल यांची भेट घेऊन चर्चा केली. भारत मॉरिशस आयात-निर्यात व्यापारा संदर्भात भविष्यात इतर देशांपेक्षा महाराष्ट्रातील उत्पादनाला जास्तीत जास्त प्राधान्य देण्यात येईल आणि पुन्हा दोन्ही देशातील हा व्यापार सुरू करण्याच्या दृष्टीकोनातून सकारात्मक पावले उचलली जातील असे आश्वासन मॉरिशसचे पंतप्रधान प्रवीण कुमार जगन्नाथ आणि परराष्ट्रमंत्री ॲलन गणू यांनी या भेटीदरम्यान त्यांना मॉरिशस येथे दिले.
भारताकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वच बाबतीत वातावरण अतिशय चांगले आहे त्यामुळे अनेक उद्योग धंद्यानाही चालना मिळत आहे असे असताना मग भारताचे अतिशय चांगले संबंध असणाऱ्या मॉरिशस देशांमध्ये मात्र व्यापारासाठी आयात निर्यातीसाठी अनेक बंधने असल्याचे दिसून येत आहे. आयात-निर्यात धोरणांतर्गत भाजी-फळे यासारख्या काही गोष्टीवर मॉरिशस कडून निर्बंध असल्याने भारतातील भाजीपाला फळे मॉरीशस मध्ये जात नाहीत. याउलट दक्षिण आफ्रिका आदी देशांमधून मॉरिशसला जास्त व नियमित पुरवठा केला जातो म्हणूनच नुकतेच महाराष्ट्रातील मुख्य निर्यातदार प्रसिद्ध उद्योजक मसुरे गावचे सुपुत्र डॉक्टर दीपक परब व राधिका परब, आरोग्य ऍग्रो फुड्स च्या अनुराधा दळवी, डॉक्टर दीपक दळवी यांनी मॉरीशस दौरा केला आणि भारतातील निर्यातदारांना मॉरिशसचे दरवाजे खुले करण्याचा प्रयत्न केला आहे.
मॉरिशस हा देश प्रामुख्याने पर्यटनासाठी सर्वांना परिचित आहे परंतु या देशाचे उसाचे पीक सोडून इतर उत्पन्न नसल्याने दैनंदिन गरजेपोटी लागणार्या अन्नधान्य कपडे व इतर सारे इतर देशांकडून मॉरीशस देश आयात करतो. मॉरिशस सर्व गोष्टींसाठी इतर देशांवर अवलंबून आहे असे असताना मात्र भारतासारख्या देशाकडून आयातीला प्राधान्य दिले जात नाही या बाबत महाराष्ट्रातील प्रसिद्ध उद्योजक डॉक्टर दीपक परब व महाराष्ट्रातील निर्यातदार दीपक दळवी यांनी नुकताच मॉरीशस दौरा करून सर्व संबंधितांशी भेटीगाठी घेतल्या. यावेळी मॉरिशसचे पंतप्रधान प्रवीण कुमार जगन्नाथ, मॉरिशसचे परराष्ट्रमंत्री ॲलन गणू तसेच मॉरिशस चेंबर ऑफ कमर्से मुख्य सचिव युसुफ इस्माईल आणि कृषी मंत्रालयाचे प्रमुख ओरी गौकरण, माझी पंतप्रधान मॉरिशस शीला बापू, प्रमुख व्यवसायिक राज बापू, मॉरिशस मराठी फेडरेशनचे अध्यक्ष आसंद गोविंद, यांची प्रामुख्याने भेट घेतली.
याशिवाय मॉरिशसमधील विविध बाजारपेठा मॉल्स, शीतगृहे, मुख्य आयातदार यांच्याही भेटी घेतल्या. भारतातून निर्यात करताना जादा भाडे, कर, कर, त्याकरता लागणाऱ्या सुविधा यासारख्या अनेक अडचणी परराष्ट्रमंत्री ॲलन गणू यांच्यासमोर मांडल्या. त्यांनी त्या समस्या समजून घेऊन ताबडतोब संबंधितांना सूचना केल्या. तसेच परब आणि दळवी यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
एलन गणू यांच्याबरोबर प्रदीर्घ झालेल्या चर्चेत विशेषतः महाराष्ट्रातील फळे भाजीपाला तसेच अन्य कृषी उत्पादनासाठी सामंजस्याने मार्ग काढला जाईल आणि भविष्यात इतर देशांपेक्षा महाराष्ट्रातील उत्पादनांना प्राधान्य दिले जाईल असेही मंत्री गणू यांनी स्पष्ट केले
मॉरिशस चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीचे मुख्य सचिव युसुफ इस्माईल यांनीही आयात-निर्यात यावर सविस्तर चर्चा करून डॉक्टर दीपक परब, डॉक्टर दीपक दळवी श्रीमती राधिका परब यांच्याबरोबर भविष्यात चांगला व्यवसाय करण्यासाठी सूचक वक्तव्य केले. शिवाय मॉरिशस मधील काही निर्यातदारांनी संपर्क करून आयात-निर्यात संदर्भात सूचना केल्या. तसेच कृषी मंत्रालयाचे ओरि गौकरण यांनीही मंत्रीमहोदयांच्या सूचनेनुसार महाराष्ट्राला प्राधान्यक्रम देण्यात येईल असे सांगितले. तसेच कांदे बटाटे आदी उत्पादनावरील निर्बंध लवकर उठले जातील असेही आश्वासन दिले.
पंधरा दिवसापूर्वी मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंकुमार जगन्नाथ हे भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांनी केलेल्या आदानप्रदान धोरण बाबत चर्चेमुळे महाराष्ट्रातील निर्यातदार डॉक्टर दीपक परब, डॉक्टर दीपक दळवी यांनी केलेल्या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या दौऱ्यामुळे भविष्यात महाराष्ट्रातील अनेक निर्यातदारांना व्यवसायासाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.
यावेळी बोलताना डॉक्टर दीपक परब म्हणाले भविष्यात महाराष्ट्रातील आयात निर्यात व्यापाराला मोठी चालना मिळणार आहे. मॉरिशस मधील सर्वांनी यासाठी सकारात्मक चर्चा घडून आणली आहे.
lतसेच मॉरीशस मराठी मंडळ फेडरेशन अध्यक्ष आसंत गोविंद, मराठी कल्चर सेंटरचे प्रेसिडेंट अर्जुन पुतलाजी, मॉरिशस मराठी स्पिकिंग युनियनचे अध्यक्ष नितीन बापू,मॉरीशस मराठी मंडळ फेडरेशन पी आर ओ श्री. विस्मा बाबिया यांचीही डॉक्टर दीपक परब आणि सहकारी यांनी भेट घेऊन आयात-निर्यात बाबत चर्चा विनिमय केला.
तसेच मॉरिशस मधील आकर्षक आणि आधुनिक पर्यटन आणि त्यामधून होत असलेला विकास सिंधुदुर्ग मधील पर्यटनामध्ये आणून यातूनही सिंधुदुर्गाचे पर्यटन कशा पद्धतीने वाढेल. त्याचाही अभ्यास, चर्चा विनिमय यावेळी तेथील पर्यटन उद्योजकांशी करण्यात आलि. मॉरिशसच्या धरतीवर सिंधुदुर्ग मध्ये टुरिझम सुद्धा करता येण्यास मोठा वाव असून या बाबत येथील व्यवसायिकांना घेऊन मार्गदर्शन करण्यात येणार आहे. महाराष्ट्राची संस्कृती ही मॉरीशस मध्ये मोठ्या प्रमाणात जतन करून ठेवण्यात आलेली असून महाराष्ट्र दिन मॉरीशस मध्ये महाराष्ट्र भवनात मोठ्या प्रमाणात विविध उपक्रमानी साजरा केला जातो. या कार्यक्रमांसाठी मॉरिशसचे पंतप्रधान, मंत्री महोदय, वरिष्ठ अधिकारी आवर्जून उपस्थित असतात हे सुद्धा आपल्या संस्कृतीला एक प्रकारचे गौरवाचे आहे