कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे पोलिसांनी बुधवारी पहाटे दोन वाजता उघड्या माळराणावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकत मोठी कारवाई केली. यात वीस जणांना ताब्यात घेण्यात आले असून सव्वा लाखाच्या रोख रकमेसह तेरा मोटार सायकल व दोन चार चाकी वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या मध्ये कणकवलीसह कुडाळ मालवण मधील काहींचा समावेश आहे.
कणकवलीचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खरात, पोलीस हवालदार दाजी सावंत, पांडुरंग पांढरे, चंद्रकांत झोरे, चंद्रकांत माने, रुपेश गुरव, मनोज गुरव, किरण कदम, किरण मेथे, कैलास इम्फाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली. शहरातील नागवे रोड लगतच्या निम्मेवाडी उचवळा या ठिकाणी हा जुगार अड्डा सुरु होता. विशेष म्हणजे पोलिसांनी गनिमी काव्याचा वापर करत रस्त्यावर ठेवण्यात आलेल्या खबऱ्यांना कोणतीही कल्पना लागू न देता ही मोठी कारवाई केली आहे. दरम्यान उघड्या माळरानावर सुरू असलेल्या जुगारात पोलिसांनी वीस जणांना ताब्यात घेतले. परंतु उघडे माळरान व अंधाराचा फायदा घेत काहींनी पलायन केले असल्याचे सांगण्यात आले.