बांदा | राकेश परब : महावितरण कंपनीच्या अभियंत्यांच्या चालढकल कारभारामुळे मडूरा गाव दोन दिवस अंधारातच आहे. अवकाळी पावसाच्या पहिल्या दिवसांपासून वीजेचा लपंडाव सुरु आहे. बांदा सहाय्यक अभियंता यादव यांच्याकडून ग्राहकांना चुकीची व संदिग्ध माहिती दिली जात असल्याने प्रचंड संताप व्यक्त होत आहे. अवकाळी पावसामुळे महावितरणच्या मर्यादा स्पष्ट झाल्या असून संबंधित कंपनीने पावसाळ्यापूर्वी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी मडुरा पंचक्रोशीतील वीज ग्राहकांमधून होत आहे.
मडुरा गावासाठी मुख्य वीज वाहिनी मडुरा हायस्कूल जवळून डीगवाडीमार्गे कास गावातून जंगलमय भागातून जाते. त्यामुळे गावाला वारंवार वीज समस्यांना सामोरे जावे लागते. तोक्ते वादळात तर १५ दिवस गाव अंधारात राहिला होता. त्याऐवजी मडुरा तिठामार्गे मुख्य वीज वाहिनी नेल्यास वीज समस्या संपुष्टात येणे शक्य आहे. तशी मागणीही ग्रामसभेतून करण्यात आली होती.
मडुरा तिठामार्गे गावातूनच मुख्य वाहिनी नेण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केल्याचे सहाय्यक अभियंत्यांनी सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात काहीच कार्यवाही झालेली नाही. मडुरा हायस्कूल ते कास मंगळमोंड दरम्यानची मुख्य वाहिनी दाट जंगलातून जाते. त्यामुळे ही लाईन महावितरणच्या अधिकार्यांना सोन्याची अंडी देणारी कोंबडी ठरली आहे. अत्यंत दुय्यम दर्जाचे सामान वापरुन तात्पुरती डागडुजी केली जाते. मंगळमोंड भागात तर वीज वाहिन्या सहा फुटांपर्यंत खाली आल्या आहेत.
अवकाळी पावसाच्या पहिल्या दिवसांपासून गेले पाच दिवस वीजेचा लपंडाव सुरु आहे. याबाबत सहाय्यक अभियंता यादव यांच्याकडून संदिग्ध माहिती देण्यात येत असल्याने गुंतागुंत वाढली आहे. वीज बीलांसाठी आग्रही असणार्या अधिकार्यांकडून वीज समस्या सोडविण्यासाठी कार्यवाही होताना दिसत नसल्याने वीज ग्राहकांमध्ये संताप आहे. ठिकठिकाणी वीज वाहिन्यांवर झुडपे वाढलेली असून त्याची साफसफाई करण्याची मोहिम हाती घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यापूर्वी सर्व वीज समस्यांचे निराकरण करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.