कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ, मर्यादित-मार्केट यार्ड पुणे या राज्यस्तरीय शिखर सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूकीत जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांची महाराष्ट्र राज्य बाजार समितीच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे.या निवडी पध्दल मनिष दळवी यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.
हे निवडणूक राज्यातील १६ मतदान केंद्रांवर घेण्यात आली होती. याची मतमोजणी २३ मार्च २०१८ रोजी निश्चित करण्यात आलेली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाकडील याचिका क्र. ७२८०/२०१८ मधील दि. २० मार्च २०१८ च्या आदेशान्वये निवडणूक निकाल जाहीर करण्यास स्थगिती देण्यात आलेली होती. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशान्वे उच्च न्यायालयाने दि. १५ मार्च २०२२ रोजीच्या आदेशान्वये सदर स्थगिती उठवून निवडणूक मतमोजणी करण्यास परवानगी दिली.
त्यानुसार, महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्या. पुणे या संस्थेची उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने मतमोजणी आज, २७ मार्च २०२२ रोजी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या. पहिला मजला, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे- ०५ येथे सकाळी ९ वाजता घेण्यात आली. सदर मतमोजणी संपल्यानंतर लगेचच निवडणूक निकाल जाहिर करण्यात आला. कोकण विभागातील मुंबई, रायगड आणि सिंधुदुर्गमधील जिल्हा बाजार समितीवरील प्रतिनिधीनींनी २३ मार्च रोजी मतदानाचा हक्क बजावला. कोकण विभाग मतदान संघासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी हे निवडणूक लढवत होते. आज साखर संकुल-पुणे येथे झालेल्या मतमोजणीमध्ये सर्वसाधारण मतदारसंघ मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या मतदारसंघात उमेदवार मनिष प्रकाश दळवी आणि आम्रे अरविंद गोविंद यांच्यामध्ये झालेला लढतीत मनिष प्रकाश दळवी हे विजयी झाले असून त्यांची महाराष्ट्र राज्य बाजार समितीमध्ये संचालक म्हणून वर्णी लागली आहे. महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या संचालक मंडळाचा कालावधी सन २०२२ ते २०२७ असा राहणार आहे.