
मालवण | अनंत पाटकर (अतिथी लेखक) : सन 1990 नंतर अलीकडील 2010 पर्यंत सिंधुदुर्गचे राजकीय वातावरण अत्यंत गढूळ बनत चालले होते. प्रा. मधू दंडवते, आप्पा गोगटे यांचा वारसा लाभलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राजकीय हत्या, राडे होऊ लागले. अंकुश राणे, सत्यविजय भिसे, मंचेकर, श्रीधर नाईक यांच्या हत्या या राज्याच्या राजकारणात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे राजकीय चित्र हे रक्तरंजित जिल्हा म्हणून निर्माण होऊ लागले.

याच दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आदर्श राजकारणाचा वारसा तसाच पुढे चालू ठेवण्याकरिता त्यावेळचे तरुणांचे गळ्यातील ताईत असलेले कै. श्रीधर नाईक यांच्या कुटुंबामधील त्यांचे पुतणे वैभव नाईक यांनी निश्चय केला. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांनी प्रेरित होऊन सन 2007 साली शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेल्या वैभव नाईक यांना बाळासाहेबांनी लागलीच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी दिली.
वैभव नाईक यांनी दहशतीखाली दबल्या गेलेल्या शिवसैनिकांना सोबत घेऊन गावागावात शाखा उभारण्याचा उपक्रम हाती घेतला, ‘गांव तिथे शाखा’ या ब्रीदवाक्याचा अवलंब करीत जिल्हाभरात प्रत्येक गावात शिवसेनेचा शाखाप्रमुख उभा केला. त्यानंतर शिवसेना पक्षाकडून सन 2009 ची विधानसभेची निवडणूक कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघामधून लढवली. या निवडणुकीमध्ये एकूण 47,666 मतं घेऊन अवघ्या 24,255 मतांच्या फरकाने वैभव नाईक यांना पराभव स्वीकारावा लागला खरा, मात्र या निवडणुकीमध्ये त्यांनी दिलेली कडवी झुंज आणि त्यावेळी असलेल्या दहशती विरोधात दिलेला लढा याने 2014 च्या विधानसभा निवडणुकीचे शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये भगवा फडकविण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे आपले मनसुबे स्पष्ट केले.
*दिनांक 19 ऑक्टोबर 2014* :
*निश्चयाचा महामेरू । बहुत जनासी आधारू,*
*अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ।*
महामेरू म्हणजे हिमवनातील एक सोनेरी शिखर, ज्याचे तेज सुर्याहूनही अधिक आहे.
याचा उल्लेख पुराणात, महाभारतात आढळतो.
निश्चयाचा महामेरू म्हणजे केलेल्या निर्धारावर एखाद्या उत्तुंग शिखराप्रमाणे ठाम राहणारा.
समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना निश्चयाचा महामेरू उक्ती दिली आहे, ज्यांनी स्वराज्याचा निर्धार केला आणि त्यावर महामेरूसारखे ठाम राहून आपल्याला आजचा सोन्याचा दिवस दाखवला..
वरील उक्तींप्रमाणेच जे स्वप्न समर्थ रामदास स्वामींनी अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना दिले याचप्रमाणे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी खुद्द बाळासाहेबांनीच वैभव नाईक यांना दिली. तेच ध्येय डोळ्यासमोर ठेऊन वैभव नाईक यांनी 15 ऑक्टोबर 2014 रोजी झालेल्या निवडणुकीमध्ये कुडाळ मालवण विधानसभेमधून पुन्हा एकदा निवडणूक लढवली आणि दिनांक 19 ऑक्टोबर 2014 रोजी वैभव नाईक 10,376 मतांच्या फरकाने आमदार झाले. संपूर्ण राज्यभरात जल्लोष केला गेला आणि आमदार वैभव नाईक यांच्या संघर्ष कहाणीस एक सोनेरी किनार लाभली.
आमदार वैभव नाईक यांच्या सोबत अखंड परिश्रम करणारा प्रत्येक जण या विजयामध्ये स्वतः विजयी झाल्याचा आनंद मिरवीत होता.
*याचसाठी केला होता अट्टाहास ।*
*शेवटचा दिस गोड व्हावा ।।*
समस्त शिवसैनिकांना ज्या दिवसाची प्रतीक्षा होती, जे स्वप्न प्रत्येक शिवसैनिकाने बघितले होते ते स्वप्न आमदार वैभव नाईक यांनी पूर्ण केले होते..
यानंतर पुढील आपल्या आमदारकीच्या काळात अनेक लोकोपयोगी कामे, कोट्यवधींचा निधी, जनसामान्यांचे प्रश्न सोडवणूक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात अनेक उपक्रम राबवून जनतेमध्ये अखंड कार्य आजतागायत चालू च आहे. एखाद्या प्रश्नावर मंत्रालयात एका कक्ष अधिकाऱ्या पासून ते त्या संबंधित विभागाच्या सचिवा पर्यंत व संबंधित मंत्र्याकडे बसून तो प्रश्न निकाली काढून संबंधितांस योग्य तो न्याय देण्याचे काम अमदार वैभव नाईक करीत आहेत.
आमदार साहेब आपल्या समाजकार्याने असेच यापुढील काळात नावलौकिक प्राप्त करोत व असेच कार्य करण्याचे बळ देवो हीच देवाकडे सदिच्छा प्रार्थना.
श्रीअनंत पाटकर (आमदार वैभव नाईक यांचे स्वीय सहाय्यक,
ग्रामपंचायत सदस्य, वडाचापाट.)