कुटुंबाच्या प्रगतीचा भार महिलांवर :प्रतिभा आळवे
बांदा | राकेश परब : लोकांना जागृत करण्यासाठी महिलांनी जागरूक असणे आवश्यक आहे. जेव्हा एखादी स्त्री आपले पाऊल पुढे टाकते तेव्हा तिचे कुटुंबही प्रगती करते, तिचे गावही पुढे येते आणि सर्वांचा विकास होतो, असे प्रतिपादन पाडलोस ग्रामसेवक प्रतिभा आळवे यांनी केले.
पाडलोस ग्रामपंचायतमध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित केलेल्या स्पर्धांच्या उद्घाटनावेळी सौ. आळवे बोलत होते. यावेळी व्यासपिठावर सरपंच अक्षरा पाडलोसकर, अंगणवाडी सेविका शुभांगी नाईक, आशासेविका कविता आंबेकर आदी उपस्थित होत्या. गावातील महिलांसाठी अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी केवळ चूल आणि मूल पुरते मर्यादित न राहता शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत व्यावसायिक क्षेत्रात उतरणे गरजेचे आहे.
यासाठी ग्रामपंचायत सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे ग्रामसेवक प्रतिभा आळवे यांनी सांगितले. सरपंच अक्षरा पाडलोसकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.