आंगणे कुटुंबियांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले भाविकांनी सहकार्य करण्याचे नम्र आवाहन.
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : आरोग्यविषयक खबरदारी म्हणून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर २४ फेब्रुवारी २०२२ रोजी संपन्न होणाऱ्या आंगणेवाडी वार्षिकोत्सवात भक्तांनी गर्दी न करता कोरोना विषयी नियमांचे तंतोतंत पालन करीत सहभागी होऊन श्री देवी भराडीचे दर्शन घ्यावे असे विनम्र आवाहन आंगणे कुटुंबीय यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
कोरोनाची तिसरी लाट जरी ओसरत असली तरी आरोग्याच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने करोना प्रतिबंधक नियमांचे तंतोतंत पालन करणे अनिवार्य आहे. मुखपट्टी म्हणजे मास्क व सॅनिटरायझर बरोबर लसीकरणाचे दोन डोस घेतलेले असणे बंधनकारक आहे तसेच ज्येष्ठ नागरिक आणि व्याधीग्रस्त नागरिकांनी उत्सवात सहभागी होणे टाळल्यास ते उचित ठरेल. वार्षिकोत्सवात सहभागी होणारे छोटे मोठे व्यापारी बंधूंनी देखील त्यांच्यासाठी पारीत करण्यात आलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून आंगणे कुटुंबियांना सहकार्य करावे आणि हा वार्षिकोत्सव दरवर्षीप्रमाणे कुठलेही गालबोट न लागता, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून शांततेत पार पडेल याची दक्षता घ्यावी.यात्रा कालावधीत आंगणे कुटुंबाच्या वतीने सर्वांना योग्य ते सहकार्य केले जाईल आणि हा यात्रा उत्सव चांगल्या पद्धतीने पार पडेल असे आंगणे कुटुंबाच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.