मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे चांदेर गावची कन्या आणि आणि सध्या मुंबई कुर्ला बैल बाजार वाडिया इस्टेट येथील राहणारी रीना बाबा परब हिने मोहाली पंजाब येथे संपन्न झालेल्या नॅशनल रोलर स्केटिंग चॅम्पियनशीप 2021 स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावून इंटरनॅशनल स्पर्धेसाठी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. या घवघवीत यशाबद्दल मुंबई कलीना येथे शिवसेनेचे आमदार श्री संजय पोतनीस आणि शिवसेना कालिना विभाग यांच्या वतीने रीना परब हिचा नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार संजय पोतनीस म्हणाले की रीना बाबा परब ही स्केटिंग मधील एक देशातील रत्न आहे. भविष्यातही अशा सर्व खेळाडूंच्या मागे ते आणि शिवसेना खंबीरपणे उभे राहतील. रीना परब आणि इंटरनॅशनल स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व खेळाडू आणि तिच्या प्रशिक्षकांना त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी मुंबई येथील शिवसेना शाखा क्रमांक 166 चे शाखाप्रमुख राजन खैरनार , राष्ट्रपती पदक पोलीस विजेते किशोर शेलार उर्फ मामा, श्री बाबा परब,योहानन फर्नांडिस, परम वडोर,सोहम मोरे, इंटरनॅशनल रोलर स्केटिंग प्रशिक्षक राहुल पदिरकर आदी उपस्थित होते. यावेळी आमदार संजय पोतनीस यांच्या हस्ते स्केटिंग मध्ये घवघवीत यश मिळविणाऱ्या योहानन फर्नांडिस- सुवर्ण, परम वडोर-रौप्य,सोहम मोरे-रौप्य पदक आणि प्रशिक्षक राहुल पदिरकर यांचाही गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी रीना परब आणि तिच्या सर्व सहकारी खेळाडूंचे कौतुक केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक खेळाडुंना प्रोत्साहन देऊन पुढे आणण्यासाठी शाखाप्रमुख राजन खैरनार यांचा नेहमीच मोठा वाटा असतो. रीना परबच्या एकंदर यशाबद्दल तिच्या मूळ गांवी चांदेर,मसुरे येथे उत्साहाचे व कौतुकाचे वातावरण आहे.