मुणगे येथील श्री भगवती हायस्कुल येथे भारतीय जवान रामचंद्र उर्फ समीर मुणगेकर यांचा सत्कार
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : “आजचा दिवस आम्हा सर्वांसाठी सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असाच आहे. ज्या शाळेत रामचंद्र मुणगेकर याने शिक्षण घेतले त्याच शाळेचे प्रजासत्ताक दिनाचे ध्वजवंदन भारत मातेचा जवान म्हणून त्याने केले आहे. मुणगे गावचा सुपुत्र तसेच आमच्या शाळेचा विध्यार्थी म्हणून आम्हा सर्वांना याचा विशेष अभिमान आहे. त्याचा आदर्श गावातील इतर युवकांनी घेऊन आपल्या कारकिर्दीची दिशा ठरवावी”, असे कौतुकाचे उद्गार व आवाहन श्री भगवती एज्युकेशन सोसायटी मुणगेचे उपाध्यक्ष सुरेश बांदेकर यांनी येथे केले. देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती हायस्कूल येथे या प्रशालेचा माजी विद्यार्थी व भारतीय सैन्यातील मराठा रेजिमेंटचा जवान रामचंद्र मुणगेकर याच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी त्याला खास आमंत्रित करून ध्वजवंदन करण्यात आले. यानंतर संस्था व प्रशालेच्या वतीने त्याचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नीलेश परुळेकर, संस्था कार्यकारणीचे प्रा. गौतम मुणगेकर,
श्री भगवती देवस्थानचे सचिव दिलीपकुमार महाजन, प्रभारी मुख्या. प्रसाद बागवे, रामचंद्रची आई सौ. मुणगेकर उपस्थित होते. प्राध्यापक गौतम मुणगेकर तसेच प्रसाद बागवे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सैन्यात भरती झाल्याबद्दल रामचंद्र यांचे अभिनंदन केले. सत्कारास उत्तर देताना रामचंद्र याने शाळा चालू झाल्या नंतर पुन्हा एकदा आपण विद्यार्थ्यांसमोर आपला अनुभव व्यक्त करण्यासाठी येईल अशी ग्वाही दिली. तसेच ध्वजवंदन करण्याची संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी नागेश घाडी, विजय पडवळ, माजी सरपंच सुरेश बोरकर, श्रीमती एम. बी. कुंज, सौ गौरी तवटे, हरीश महाले, बाबाजी सावंत, एन जी विरकर, गुरुप्रसाद मांजरेकर, सौ.मिताली हिर्लेकर, प्रणय महाजन, स्वप्निल कांदळगावकर, श्री रासम, अशोक मुणगेकर, संतोष मुणगेकर, मनोहर कडू, श्री नार्वेकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक व आभार प्रभारी मुख्याध्यापक प्रसाद बागवे यांनी मानले.