पोईप | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील बागायत येथे कोल्हापूरहून मालवणात आलेल्या पर्यटकांच्या चारचाकी वाहनाचा प्रवासा दरम्यान अपघात झाला. प्रवास करणारे पाचही जण सुखरूप असल्याचे समजते. प्रत्यक्षदर्शी पाहणाऱ्यांच्या म्हणण्यानुसार अपघात भीषण असूनही जीवीतहानी झाली नाही हे सुदैवाचे आहे असे सांगण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, मालवण येथे फिरण्यासाठी आलेले कोल्हापूर येथील पर्यटक परतीचा प्रवास करण्यासाठी मालवण – बेळणे रस्त्याने प्रवास करत असताना, बागायत येथील विठ्ठला देवी पुलानजीक चालकाला डुलकी लागली आणि चालकाचा ताबा सुटला. गाडी वेगात रस्त्याच्या बाजूला असलेल्या विजेच्या खांबाला आधार देण्यासाठी पुरण्यात आलेल्या तारेला धडकली. संरक्षक दगडाला आदळून गाडी हवेत फिरली आणि चारही चाके पलटी झाली. अपघात एवढा भीषण होता की मालवण कडून कोल्हापूरला जाणारी गाडी अपघातानंतर विरुद्ध दिशेला कलंडून स्थिरावली. यात गाडीचे ष्रचंड नुकसान झाले असल्याचे समजते.

गाडीचा अपघात होताच मोठा आवाज झाल्याने तात्काळ बागायत येतील स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन गाडीत अडकलेल्या पाचही व्यक्तींना. दरवाज्याच्या खिडकीतून बाहेर काढले तसेच आतील सामान काढून दिले. तसेच त्यांची विचारपूस केली असता दुपारच्या उन्हामुळे चालकाला डुलकी लागल्याने अपघात झाल्याचे सांगितले . यानंतर जेसीबीच्या सहाय्याने गाडी स्थानिकांनी रस्त्यावर आणून दिली.
गाडीतील व्यक्ती या कोल्हापुर येथील असून ते महावितरणचे कर्मचारी असल्याचे सांगण्यात आले. अपघातग्रस्त व्यक्तींनी बागायत येथील स्थानिक ग्रामस्थांचे तसेच मदत करणाऱ्या सर्व व्यक्तींचे आभार मानले.