यशस्वी जयस्वालला १५ जणांच्या चमूतून वगळले मात्र राखीव खेळाडू म्हणून स्थान.
भारतीय जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये खेळू शकणार नाही. त्याची जागा युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणा घेईल.
१९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होणार असून भारताची पहिली लढत २० तारखेला बांगलादेशविरुद्ध होणार आहे तर २३ तारखेला टीम इंडियाला पाकिस्तानविरुद्ध खेळायचे आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी संघात झालेला आणखी एक बदल म्हणजे युवा फलंदाज यशस्वी जयस्वालचे नाव अंतिम १५ खेळाडूंच्या यादीतून वगळण्यात आले असून त्याच्या जागी वरुण चक्रवर्तीला संधी देण्यात आली आहे. मात्र राखीव खेळाडूंच्या यादीत वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि शिवम दुबे यांच्यासोबत त्याचा समावेश करण्यात आला आहे. हे तिघे संघासोबत दुबईला जाणार नाहीत. त्यांची गरज पडल्यास संघात बोलावले जाऊ शकते.
कर्णधार रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करेल आणि त्याचा सलामीचा जोडीदार शुभमन गिल उपकर्णधार असेल. स्टार फलंदाज विराट कोहली आणि श्रेयस अय्यर फलंदाजी क्रमाला बळकटी देतील. यष्टीरक्षक आणि फलंदाज म्हणून संघात ऋषभ पंत आणि केएल राहुल हे दोन पर्याय असतील.
गोलंदाजी विभागात रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर हे फिरकीपटू असतील तर ऑलराउंडर हार्दिक पांड्या हा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंगला साथ देईल.
नव्याने जाहीर झालेला संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, के एल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.
राखीव खेळाडू ( ते संघासोबत जाणार नाहीत): यशस्वी जैस्वाल, मोहम्मद सिराज, शिवम दुबे.
क्रीडा ब्यूरो