मसुरे | प्रतिनिधी : दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने १९ जानेवारी २०२५ रोजी इ.पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. सध्याचे युग हे स्पर्धेचे आणि ध्येय प्राप्तीचे आहे. शिक्षणाच्या या स्पर्धात्मक ध्येय पथावरून चालताना जीवनाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनात दुर्दम्य इच्छाशक्ती आणि जिद्द असावी लागते. प्राथमिक स्तरावर शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना अशी आभाळस्पर्शी महत्त्वकांक्षा बाळगण्याची सवय लावायला हवी. चाकोरीबद्ध पुस्तकी ज्ञानापेक्षा सध्याच्या स्पर्धात्मक युगात त्याच्या बौद्धिक क्षमतेची सर्वांगीण वाढ होणे गरजेचे आहे आणि या क्षमतांचा विकास प्राथमिक स्तरावर होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षांमधून होत असतो. प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेच्या या पहिल्या स्पर्धात्मक टप्प्याला सामोरे जाताना त्यांच्या मनात अनामिक भिती आणि न्यूनगंड निर्माण होणे स्वाभाविक आहे. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अशा स्पर्धांना सामोरे जाताना अनेक अडचणी आणि समस्या येत असतात. यासाठी शिष्यवृत्ती परीक्षेचे दडपण दूर व्हावे आणि निर्भयतेने विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा यासाठी दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग या सामाजिक संस्थेच्या वतीने इ. पाचवी आणि आठवीच्या मराठी माध्यम च्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षा १९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता कणकवली कॉलेज कणकवली येथे आयोजित करण्यात येत आहे . परीक्षेसाठी १५ जानेवारी २०२५ पर्यंत नाव नोंदणी करवी असे संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या सराव परीक्षेचा लाभ घेऊन आपल्या गुणवत्तेत वाढ करावी असे आवाहन स्पर्धा प्रमुख दिलीप कदम, अमोल जाधव,विशाल कासले,नरेंद्र तांबे, यांच्या वतीने करण्यात येत आहे.
संपर्क: दिलिप कदम,88050 88320, नरेंद्र तांबे 7588584793, विशाल कासले 84110 98061, अमोल जाधव 94212 37265 या व्हाट्सअप नंबरवर १५ जानेवारी पर्यंत मुलांची यादी पाठविणे आवश्यक आहे.
इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती सराव परीक्षा मध्ये प्रथम दहा येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान संस्थेच्या वतीने करण्यात येणार आहे अशी माहिती अध्यक्ष आनंद तांबे यांनी दिली आहे.