फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणीच्या मागणीचे तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांना निवेदन.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण एसटी स्टॅन्ड समोर बुधवारी २४ सप्टेंबर रोजी दुपारी प्रीती गोवेकर ( पूर्वाश्रमीच्या सौभाग्यश्वरी गोवेकर) या महिलेवर पेट्रोल ओतून जाळल्याच्या व त्यानंतर उपचारा दरम्यान तिचा झालेला दुर्देवी अंत या घटनेच्या पार्श्वभूमीवर, मालवणमधील विविध क्षेत्रातील तसेच विविध पक्षीय महिलांनी एकत्र येत दिवंगत प्रीती यांच्या न्यायाची मागणी केली. यावेळी उपस्थित असंख्य महिलांनी दिवंगत प्रीती ह्यांच्या मृत्यूतील संशयित आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये दाखल करावे, यात आणखी कोणाचा सहभाग असल्यास त्यांचाही शोध घेऊन कठोरात कठोर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन मालवण तहसीलदार व पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांना सर्व महिलांच्या वतीने दिले.
यावेळी संतप्त महिलांनी मालवण तालुक्यातील एकाही वकिलाने संशयित सुशांत गोवेकर याचे वकीलपत्र घेऊ नये अशी मागणी केली. पोलिस प्रशासनाने त्याला अटक केलेली आहेच व त्याला आता जास्तीत जास्त कठोर कलमं लावून शिक्षा व्हावी असे सांगताना पोलिस प्रशासनावर आमचा भरवसा आहे असेही महिलांनी सांगितले. हा घडलेला दुर्दैवी प्रकार मालवणमधील पहिला व शेवटचाच असेल कारण आता यानंतर मालवणच्या महिला अशा वृत्तींना कसा ठेचायचा यासाठी सक्षम आहेत व त्या रडणार्या नाहीत तर लढणार्या आहेत असाही इशारा उपस्थित सर्व महिलांच्या वतीने देण्यात आला. मालवणमधील महिलांच्या सहनशीलतेचाही अंत कोणी बघू नये तसेच महिलांनी त्यांना होणार्या छोट्या छोट्या त्रासाची, ताण तणावाची वगैरे माहिती एकमेकिंना किंवा पोलिस प्रशासनाला वेळच्या वेळी देत जावी जेणेकरुन त्यावर तत्काळ उपाययोजना करुन अशा वृत्तींचा जागच्याजागी बंदोबस्त होईल असेही महिलांनी सूचीत केले. जिच्या उदरातून संपूर्ण दुनिया जन्म घेते ती विश्वशक्ती आहे याचा कोणाला विसर पडू नये आणि दिवंगत प्रीती यांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी हे एकत्रीत येणे हा उद्देश असल्याचे उपस्थित महिलांनी सांगितले. संबंधित संशयित हा गुन्हेगार वगैरे नसून नराधम आहे आणि तो जर बाहेर समाजात दिसला तर सर्व महिलाच त्याला शिक्षा करतील अशा तीव्र भावनेचा आक्रोशही उपस्थित महिलांनी केला. या पुढे मालवणात कोणाचीही महिलेला त्रास द्यायची हिंमत झाली तर आम्ही कोणाच्या सहकार्याची वाट बघणार नाही तर स्वतः सक्षमतेने त्याचा निकाल लावू असा इशाराही या महिलांनी दिला.
मालवण पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी या महिलांच्या भावना ऐकून घेत संशयित आरोपीवर योग्य ती कायदेशीर पद्धतीने कारवाई केली जाईल असे आश्वस्त केले आणि महिलांचे निवेदन स्विकारले. यावेळी शितल बांदेकर, डॉ मालविका झाट्ये, शर्वरी पाटकर, शिल्पा खोत, पल्लवी खानोलकर, पूनम चव्हाण, पूजा वेरलकर, अन्वेषा आचरेकर, नीनाक्षी मेतर, अंजना सामंत, विद्या फर्नांडिस, नयना पोयेकर, रश्मी परुळेकर, सोनाली पाटकर, ममता तळगावकर, प्राची माणगावकर, रेश्मा शिंदे, रूपा कुडाळकर, दिव्या कोचरेकर, प्रतिमा भोजने यांच्यासह असंख्य महिला उपस्थित होत्या.