आ. वैभव नाईक यांनी गेल्या १० वर्षांत केव॓ळ स्वतःची आर्थिक डेवलपमेंट केली असल्याचेही भाजपा जिल्हा प्रवक्ते मोंडकर यांचे भाष्य ; पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सारखा जनता दरबार भरवायची हिंमत नसल्याची जोडली पुस्ती.
राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पुन्हा उभारण्या संदर्भात प्रक्रिया सुरु झाल्याची मोंडकर यांची माहिती.
मालवण | प्रतिनिधी : भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर यांनी, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणी व दुर्घटना व या विषयांबाबत भाजपा कार्यालय मालवण येथे आयोजीत पत्रकार परीषदेत आमदार वैभव नाईक यांच्यासह विरोधकांना खडे बोल सुनावले आहेत. देशाचे संरक्षण करणार्या नेवीवरच संशय घेणे हे अत्यंत चुकीचे असल्याचे सांगत मोंडकर यांनी स्वार्थी राजकारणाच्या नादात नेवीवर संशय घेणे अत्यंत चुकीचे असल्याचे अधोरेखित केले. राजकोट येथील पुतळा दुर्घटना ही अत्यंत दुःखद व वेदनादायी होती व त्याचे आम्हाला अतीव दुःख आहे असे त्यांनी सांगितले. आता नवीन पुतळा उभारणी तथा दुरुस्ती संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने २० कोटी खर्चाने हे काम पूर्ण केले जाईल आणि त्याच्या निविदा प्रक्रिया सुरु झाल्याची माहिती भाजपा जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर यांनी दिली आहे. छत्रपतींचा पुतळा पुनश्च उभारून तो शिवप्रेमींसाठी व अभ्यासक आणि पर्यटकांसाठी लवकरच खुला होईल अशी भाजपाच्या वतीने मोंडकर यांनी आशा व्यक्त केली.
या दरम्यान या प्रश्नावर विरोध करणारे आमदार वैभव नाईक व त्यांच्या सहकारी विरोधकांबद्दल बोलताना बाबा मोंडकर म्हणाले की गेल्या दहा वर्षात आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या विकास कामांसाठी त्यांच्याच क्रशरवरील खडी, त्यांचेच डंपर वापरले गेले त्यामुळे आ. वैभव नाईक यांनी फक्त स्वतःची आर्थिक डेवलपमेंट केली. या दरम्यान त्यांच्या बगलबच्च्यांनी केलेली मालवणातील पेवर ब्लाॅकची विकास कामे खचली आहेत व स्पोर्टस् काॅम्प्लेक्सचे काम रखडले असेही मोंडकर यांनी सांगितले.
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून छत्रपतींचा प्रेरक इतिहास सर्वदूर पोचवण्याचे कार्य सुरु आहे आणि शाश्वत पर्यटना द्वारा सर्वांगीण विकासकार्यावर भाजपाचा विश्वास असल्याचे मोंडकर यांनी सांगितले. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासारखे जनता दरबार आयोजन करायची आ. वैभव नाईक यांची हिंमत नसल्याचेही प्रतिपादन भाजपा जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर यांनी केले.
या पत्रकार परीषदे दरम्यान भाजपा मालवण कार्यालयात माजी नगरसेवक दीपक पाटकर, माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, माजी नगरसेवक पंकज सादये, नंदू देसाई, भालचंद्र राऊत, निशय पालयेकर, केदार झाड, आबा हडकर, सागर चव्हाण, महेश सारंग भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.