कर्णधार युवराज सिंगच्या भारतीय लिजंडस् संघाने पाकिस्तानला ५ चेंडू व ५ विकेटसने हरवत पटकावला पहिला वहिला वर्ल्ड चॅम्पियशीप ऑफ लीजंडस् चषक…!
क्रीडा | सुयोग पंडित : इंग्लंड मधील एजबेस्टन ( बर्मिंगहॅम ) येथे ३ जुलै ते १३ जुलै अशा खेळवल्या गेलेल्या पहिल्या वहिल्या वर्ल्ड चॅम्पियशीप ऑफ लीजंडस् टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेतील अंतीम सामन्यात, भारताने पारंपरीक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ५ विकेटस् व ५ चेंडू राखत विजय मिळवला. भारतीय क्रिकेट संघाने टी ट्वेंटी विश्वचषक २०२४ मिळविल्यानंतर दहा दिवसांतच भारतीय माजी खेळाडुंनी या विश्व स्तरीय स्पर्धेत विजेतेपद मिळवल्यामुळे भारतीय क्रिकेट चाहते आनंदात दिसत आहेत.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणार्या पाकिस्तान लिजंडस् संघाने, निर्धारीत २० षटकात १५६ धावा जमविल्या. कामरान अकमल २६ धावा व शोएब मलिकच्या ४१ धावांच्या बळावर पाकिस्तान संघाने ही आव्हानात्मक धावसंख्या उभारली. भारतीय गोलंदाज अनुरीत सिंगने ४३ धावात ३ बळी घेतले.
१५७ धावांचे लक्ष्य समोर घेऊन उतरलेल्या भारतीय लिजंडस् संघाच्या अंबाती रायडूने जलद ५० धावा जमविल्या. त्याला गुरकिरत मान ३४ धावा, युसूफ पठाण ३० धावा व युवराज सिंगच्या नाबाद १५ धावांची साथ लाभली आणि भारताने ५ चेंडू व ५ बळी राखत या स्पर्धा विजयावर कब्जा केला. पाकिस्तानतर्फे अमीर यामीनने २ बळी घेतले.
या स्पर्धेत भारता तर्फे इरफान पठाण, युसूफ पठाण, युवराज सिंग, सुरेश रैना, विनय कुमार, अंबाती रायुडू, राॅबिन उत्थापा या माजी माजी भारतीय खेळाडुंनी स्पर्धेतील विविध सामन्यांवर त्यांची छाप सोडली. अंबाती रायडूला अंतीम सामन्यातील सामनावीर तर स्पर्धेत ३ अर्धशतकांसह २२१ धावा केलेल्या युसूफ पठाणला स्पर्धावीराचा बहुमान मिळाला.