बांदा | राकेश परब : मालपे – पेडणे येथील मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तोरसेहून पणजीच्या दिशेने असलेली संरक्षक भिंत कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी व अन्य नुकसान झाले नाही. नियोजनाचा अभाव व अधिकार्यांसह आमदार, मंत्र्यांच्या दुर्लक्षामुळे तसेच निकृष्ट कामामुळे संरक्षक भिंत कोसळल्याचा आरोप स्थानिकांतून होत आहे.

पेडणे – मालपे येथील भिंत मुसळधार पाऊस पडल्यास टिकणार नाही अशी चर्चा वाहनचालक तसेच स्थानिकांत आधीपासूनच होती. पहिल्याच पावसात महामार्गाच्या कामाचे वाभाडे निघाल्याने संबंधित कंपनीच्या एकंदरीत कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केली जात आहे. सुदैवाने या ठिकाणी पोहोचलेल्या एका चारचाकीला कोणताही अपघात झाला नाही. पण एकंदरीत परिस्थितीचे आकलन करता, येत्या काळात याप्रकारच्या अनेक घटना घडून प्रवाशांच्या जिवास धोका उद्भवू शकतो. दरम्यान, संरक्षक भिंत कोसळताच एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली होती. तसेच पेडणे पोलिस तत्काळ हजर झाले होते.