किल्ले भरतगड येथे स्थापना कार्यक्रमात संस्थापक अध्यक्ष श्री. श्रीकांत सावंत यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे येथील किल्ले भरतगड येथे, ‘रत्नागिरी सिंधुदुर्ग सर्वांगीण जिल्हा सर्वांगीण विकास परीषद’ या नविन सामाजिक संस्थेचा स्थापना सोहळा संपन्न झाला. यावेळी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. श्रीकांत सावंत यांच्या समवेत मर्डे सरपंच श्री. संदीप परब, उपसरपंच श्री. राजेश गांवकर, माजी जि. प. सभापती श्री. संग्राम प्रभूगांवकर, माजी जि. प. अध्यक्ष सौ. सरोज परब व मान्यवर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवस्वराज्य राज्याभिषेकाच्या ३५० वर्ष पूर्तिनिमित्त या संस्थेची स्थापना झाली आहे.
किल्ले भरतगड येथील मुख्य सोहळ्या पूर्वी, मसुरे येथील श्री देवी पावणाई मंदिर येथे अध्यक्ष श्रीकांत सावंत यांच्यासह उपस्थित सर्वांची एकत्रित बैठक संपन्न झाली. त्यानंतर श्री. श्रीकांत सावंत यांनी किल्ले भरतगड येथील श्री. देव सिद्ध महापुरुषाचे दर्शन घेऊन पूजन केले.
स्थापना कार्यक्रमात श्री. ऐश्वर्य मांजरेकर यांनी मंचावरील उपस्थित मान्यवर श्री. श्रीकांत सावंत, श्री. संग्राम प्रभूगांवकर, सरपंच श्री. संदीप हडकर व सौ. सरोज परब, उपसरपंच राजेश गांवकर यांचे पुष्प देत स्वागत केले.
स्थापना कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी मान्यवर श्री. संग्राम प्रभूगांवकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला वंदन करुन पुष्पहार अर्पण केला. मान्यवरांची छत्रपतींच्या चरणी पुष्पार्पण केले.
त्यानंतर रत्नागिरी – सिंधुदुर्ग विकासपरीषदेचे संस्थापक अध्यक्ष श्री. श्रीकांत सावंत यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.
रत्नागिरी – सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यातील स्थानिक रहिवासी तसेच देशात व परदेशात असलेले इथले मूळ निवासी अशा सर्वांनीच या संस्थेमध्ये सक्रीय सहभाग घ्यावा असे आवाहन यावेळी संस्थापक अध्यक्ष श्री. श्रीकांत सावंत यांनी केले. ते पुढे म्हणाले की रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यातील आरोग्य, शिक्षण, रोजगार, रस्ते या घटकांकडे इथल्या प्रत्येकाने एकत्र येऊन सक्रीयता दर्शवली तर राज्य शासन व केंद्र शासन यांना आमच्या विकासाच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावाच लागेल. आपल्याकडील सर्वपक्षीय राजकीय क्षेत्रातील धडाडी ही अत्यंत उल्लेखनीय आहे. त्या धडाडीनेच आपण एकसंघ होऊन दोन्ही जिल्ह्यांसाठी भरीव योगदान देऊ शकतो. बंदर विकास, पर्यटन तसेच कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वे मध्ये विलनिकरण अशा विविध माध्यमांतून आपल्या दोन्ही जिल्ह्यांना भरघोस निधी मिळावा म्हणून आपण आग्रही राहीलो तर आपल्याकडे पर्यटन वाढ आणि रोजगार संधी यांची विपुलता निर्माण होईल. आपण वेळोवेळी खासदार, पालकमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही इ मेल द्वारे पत्राने, रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रलंबित गोष्टींबद्दल संपर्क करत असतो असेही श्री. श्रीकांत सावंत यांनी सांगितले.
यावेळी बोलताना मर्डे सरपंच श्री. संदीप हडकर यांनी श्रीकांत सावंत यांच्या संकल्पनेची प्रशंसा केली व त्यांच्या या संस्थेची स्थापना मसुरे भरतगड येथे होत आहे याबद्दल आनंद व्यक्त केला. या संस्थेला मसुरे गावातर्फे सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे सांगितले.
यावेळी शुभेच्छा देताना माजी जिल्हा परीषद अध्यक्ष श्री. संग्राम प्रभूगांवकर यांनी मसुरे गांवचे सुपुत्र श्री. श्रीकांत सावंत, हे पासलेगांवकर महाराज यांचे शिष्य आहेत त्यामुळे समाजसेवेचे व्रत कशापद्धतीने चालवावे हे त्यांना ज्ञात आहे. यापूर्वी त्यांनी मानवता विकास परिषदेचे जनजागृतीचे काम केलेले आहे. मसुरे गांव हे निवडणूकी दरम्यान जरी संवेदनशील असले तरी निवडणुका संपताच मसुरे गांवचे सर्वजण हे गांवच्या विकासासाठी, सामाजिक बांधिलकीसाठी एकदिलाने काम करतात त्यामुळे त्याच अपुषंगाने या संस्थेचा उद्देश सफल होवो. या संस्थेच्या माध्यमातून होणार्या सर्व चांगल्या कामांना आपला पाठिंबा व सहकार्य असेल.
यावेळी या संस्थेले शुभेच्छा देताना माजी जिल्हा परीषद अध्यक्ष सौ. सरोज परब म्हणाल्या की, मसुरे गांवचे सुपुत्र व ज्येष्ठ समाज संघटक श्रीकांत सावंत यांची मसुरे गांव व रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्याविषयी तळमळ आपण सगळे जण पहात आलो आहोत. पर्यटन वाढ हा आपल्या सर्वांसाठीच जिव्हाळ्याचा विषय आहे व त्यासाठी लोकांनी पुढे येऊन यातील विकासाचा आग्रह धरावा ही श्रीकांत सावंत यांची संकल्पना अत्यंत स्तुत्य आहे. यासाठी आपण त्यांना नेहमीच सहकार्य केले जाईल. आपण रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने केंद्र व राज्याच्या नेतृत्वाकडे व खासदार आणि पालकमंत्र्यांकडे सुद्धा वेळोवेळी पत्रव्यवहार तथा इमेल द्वारा संपर्क करत असतो असेही त्यांनी सांगितले.
या स्थापना सोहळ्याला मान्यवर मर्डे यांच्यासह माजी जि प अध्यक्ष श्री. संग्राम प्रभूगांवकर, सौ. सरोज परब, सरपंच श्री. संदीप हडकर, उपसरपंच श्री. राजेश गांवकर, ग्रामपंचायत सदस्य श्री. राघवेंद्र मुळीक, पंढरीनाथ नाचणकर, जयईंद्र मुणगेकर, रामचंद्र मसूरकर, दिलीप मोरे, दीपक दुखंडे, राजन मयेकर, दिलीप बागवे, ऐश्वर्य मांजरेकर, सिताराम म्हाडगुत, अशोक बागवे, नामदेव मठकर, स्वप्नील मीटकर, शंकर मेस्त्री व श्री. दत्तप्रसाद पेडणेकर उपस्थित होते. श्री. नामदेव मठकर ((सेवा निवृत्त अधिक्षक, जिल्हा न्यायालय) यांनीही रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषद संस्थांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व श्री. श्रीकांत सावंत यांची ही संकल्पना स्तुत्य असल्याचे विशेष नमूद केले.
संस्थापक अध्यक्ष श्री. श्रीकांत सावंत यांनी या संस्थेच्या स्थापना सोहळ्याला उपस्थित रहाणार्या सर्व मान्यवरांचे आभार मानले आणि हो संस्था आपली आहे म्हणून संस्थेच्या वाटचालीत सर्वांनी व्यापक स्तरावर सक्रीय रहावे असे आवाहन केले. श्री ऐश्वर्य मांजरेकर यांनी श्री. श्रीकांत सावंत यांच्यासह उपस्थित सर्वांचे आभार मानले.