शिरगांव | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड
देवगड तालुक्यातल्या शिरगाव – साळशी या मार्गावरील धोकादायक वळणामुळे चालकांना वाहने हाकताना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. हा मार्ग अरुंद असून समोरून येणारी वाहने पटकन दिसत नसल्याने मोठा अपघात घडण्याची शक्यता वाहनचालकांमधून व्यक्त होत आहे. शिरगांव – साळशी या प्रमुख जिल्हा मार्ग क्र. ६ रस्त्यावर समोरून एखादे अवजड वाहन आल्यावर छोट्या वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन वाहने हाकावी लागत असल्याचे ते सांगत आहेत. रस्त्यावर काही ठिकाणी तीव्र चढ – उतार, तसेच नागमोडी वळणे असल्याने समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. अशावेळी अचानक समोरून एखादे वाहन आल्यास चालकाला वाहनावर नियंत्रण ठेवणे कठीण होते. अशावेळी अपघाताची शक्यता निर्माण होऊ शकते, असे वाहन चालकांचे म्हणणे आहे.
सध्या पावसाळा सुरू असल्याने रस्त्यावरील काही ठिकाणी पाणी निचरा होत नाही. तसेच रस्त्याला काही भागात बाजूचीपट्टी सुस्थितीत नसल्याने छोट्या वाहनचालकांना तसेच दुचाकी चालकांना तारेवरची कसरत करीत वाहने चालवावी लागतात. या रस्त्यावरील अडचणी दूर करण्याची मागणी होत आहे. या मार्गावर सतत मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी सुरू असते. अवजड वाहतूक, तसेच एसटी बस सेवा सुरू असते. अशावेळी समोरून येणाऱ्या वाहनांना बाजू देताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे.