चिपळूण | ब्यूरो न्यूज : चिपळूण तालुक्यातील निसर्गरम्य श्री क्षेत्र टेरव या पुरातन व सुप्रसिद्ध देवस्थानचे ग्रामदैवत श्री वाघजाई देवी आणि कुलदैवत श्री कुलस्वामिनी भवानी देवी आहे. श्री काळकाई देवी ही माहेरवाशिणींची रक्षणकर्ती देवी म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच जागृत आणि नवसाला पावणाऱ्या देवता असा या देवतांचा लौकीक आहे. शक्ती, युक्ती, बुद्धी व भक्ती यांचा अजोड मिलाप असलेल्या महाबली श्री हनुमान जन्मोत्सव चैत्र पौर्णिमेला साजरा करण्यात येतो, यंदा हा उत्सव मंगळवार दिनांक २३ एप्रिल रोजी मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे.
चैत्र पौर्णिमेला रुढी परंपरेनुसार सूर्योदय झाल्यावर ब्राम्हण, मानकरी, ग्रामस्थ आणि पुजारी यांच्या उपस्थितीत मंदिरात हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो. दुपारी १२ वाजता ग्रामस्थांच्या उपस्थितीत दोन्ही मानकरी श्रीफळाच्या तीन जोड्या श्री कुलस्वामिनी भवानी मातेसमोर ठेवतात व गाऱ्हाणे घालून पुजारी ते श्रीफळ वाढवितात व प्रसाद म्हणून मानाप्रमाणे त्याचे वाटप करतात. तसेच मंदिराच्या पोवळीबाहेर पूर्व दिशेस देवीचे देणे मागणे दिले जाते. मंदिराच्या बाहेर पावट्याच्या घुगऱ्या व देवीच्या देण्या मागण्याचा प्रसाद दिला जातो. रुढी परंपरेनुसार पूजाविधी संपन्न झाल्यावर, पुजारी पालखीत कुलदैवत श्री भवानी, ग्रामदैवत श्री वाघजाई, भैरी, केदार, महालक्ष्मी व कुलस्वामिनी या देवतांची रुपी लावतात. शतकाच्या दिशेने वाटचाल करणारा टेरव गावचा चैत्रपौर्णिमा जत्रोत्सव म्हणजेच ग्रामस्थ, माहेरवाशिणी, चाकरमानी आणि भक्तांच्या आनंदाला उधाण आणणारा दिवस असतो. चैत्र पौर्णिमे निमित्त पंचक्रोशीतील मौजे कामथे व चिंचघरी येथील पालख्यांचे मिरवणुकीने वाजतगाजत रात्रौ टेरव येथे आगमन होते. पालख्या विद्युत रोषणाईंनी तसेच विविध प्रकारच्या फुलांनी सजविलेल्या असतात. ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळीत तिन्ही पालख्यांची मिरवणूक मंदिराकडे मार्गस्थ होते. तिन्ही पालख्या नाचत उंचावून एकमेकींना भेटतात ते दृश्य विलोभनीय असते. मंदिरात तिन्ही पालख्या स्थानापन्न झाल्यावर दर्शनासाठी आणि ओटी भरण्यासाठी प्रचंड गर्दी होते. त्या नंतर रात्रौ मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
दुसऱ्या दिवशी सकाळी दोन्ही पालख्यांची पूजा व सन्मान केल्यावर आपआपल्या गावी मार्गस्थ होतात. त्यावेळी टेरवची पालखी मंदिराच्या उत्तरेच्या प्रवेशद्वारापर्यंत निरोप देण्यासाठी नेली जाते आणि अशाप्रकारे जत्रोत्सवाची सांगता होते.
तरी सर्व भाविक, चाकरमानी, माहेरवाशिणी व हितचिंतक यांनी दर्शनाचा लाभ घ्यावा अशी विनंती ग्रामस्थ टेरव यांनी केली आहे.