मालवण | सुयोग पंडित : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था ‘सारथी’ ही मराठा समाजातील आर्थिक दुर्बल लक्षित गटाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी विविध योजना व उपक्रम राबविते. या उपक्रमाचा महत्वाचा भाग म्हणजे वय वर्षे १८ पूर्ण असणा-या व दहावी उत्तिर्ण असणा-या गरजू होतकरू मराठा समाजातील युवक – युवतींसाठी सारथी संस्थेच्या वतीने सहा महिने कालावधीचा, करिअरविषयक संपूर्ण तयारी करून घेणारा ‘CSMS-DEEP’ हा कंप्यूटर डिप्लोमा कोर्स MKCLच्या अधिकृत संगणक प्रशिक्षण केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. सध्या कुडाळ हायस्कूलजवळील मराठा समाज हाॅल बिल्डिंगमध्ये ‘गेट्स कंप्युटर अकॅडमी’ या MKCLच्या अधिकृत केंद्रामध्ये या डिप्लोमाचे तंत्रशुध्द प्रशिक्षण सुरू आहे.
‘
गेट्स कंप्युटर अकॅडमी’ मध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या लाभार्थी विद्यार्थ्यांनी शासन व सारथी संस्थेच्या निर्देशानुसार, मराठा समाजातील आर्थिक मागास गटासाठीच्या इतर विविध योजनांचे, प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ‘चावडी वाचन’ केले. नेरूर ग्रामपंचायत व माड्याचीवाडी ग्रामपंचायत मधील उपस्थित ग्रामस्थांनी या योजनांच्या माहितीपूर्ण ‘चावडी वाचनाचा’ लाभ घेतला.
या प्रसंगी दोन्ही ग्रामपंचायत सभागृहामध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी व मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते.