मसुरे | प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या २०२३ च्या कोतवाल भरती प्रक्रियेत अन्याय झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या बांदिवडे येथील श्रीम. श्रुती विनायक गांवकर या आज १९ डिसेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यलय ओरोस येथे बेमुदत उपोषणास बसल्या आहेत. सजा बांदिवडे बुद्रुक, ता. मालवण मधील कोतवाल भरतीत निवड झालेल्या उमेदवार श्रीम. सोनल विवेक खरात यांच्या निवडीवर श्रुती विनायक गांवकर यांनी निवेदनाद्वारे आक्षेप घेतला आहे. त्याबाबत चौकशी होऊन कार्यवाही न झाल्याने बेमुदत उपोषणास बसत असले बाबत जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, उपविभागीय अधिकारी कुडाळ व तहसिलदार मालवण याना निवेदन दिले आहे.
निवेदनात श्रुती गावकर यांनी उल्लेख केल्या नुसार कोतवाल भरती बाबत दिनांक १४/०८/२०२३ रोजी जाहिरनामा प्रसिध्द करणेत आलेला होता. सदर जाहिरनाम्यास अनुसरून श्रुती गांवकर यांनी तलाठी सझा बांदिवडे बुद्रुक येथे अनुसुचीत जाती (महिला आरक्षण) या प्रवर्गातून अर्ज सादर केला होता. सदर जाहिर नाम्यातील कोतवाल भरती वेळापत्रका प्रमाणे दिनांक १४/०८/२०२३ रोजी जाहिरात प्रसिध्द करणेत आली व अर्ज स्वीकारण्या ची अंतिम तारीख २५/०८/२०२३ अशी होती. व त्या नंतर अर्जाची छाननी करुन परिक्षेसाठी पात्र/अपात्र उमेदवारांची यादी दिनांक २९/०८/२०२३ रोजी प्रसिध्द करणे असे वेळापत्रक होते. दिनांक १०/०९/२०२३ रोजी लेखी परिक्षा झाले नंतर दिनांक १२/०९/२०२३ रोजी पात्र उमेदवारांची अंतिम यादी तहसिलदार मालवण यांचे नोटीस बोर्डवर प्रसिध्द करणेत आली. सदर यादी प्रसिध्द झालेनंतर श्रीमती सोनल विवेक खरात, रा. कुंभारमाठ ता. मालवण यांचे नांव कोतवाल सजा बांदिवडे बुद्रुक या सजासाठी प्रथम व श्रुती विनायक गांवकर, बांदिवडे यांचे नाव प्रतिक्षा यादीत द्वितीय आले.
अर्जदार हा तालुक्याचा स्थानिक रहिवासी असावा व तालुक्याची अर्जदारास माहिती असणे आवश्यक आहे अशी अट होती. सदर अटीस अनुसरुन श्रीमती सोनल विवेक खरात ही मालवण तालुक्याची रहिवासी नाही. सदरची बाब लक्षात आल्यावर श्रुती गांवकर यांनी तत्काळ उपविभागीय अधिकारी कुडाळ व तहसिलदार मालवण यांचेकडे संदर्भित आक्षेप क्रमांक ३ अन्वये श्रीमती खरात यांचे निवडीवर दिनांक १३/०९/२०२३ रोजी आक्षेप नोंदविला. यांची सखोल चौकशी करुन, आवश्यक ती कार्यवाही करणेसाठी उपविभागीय अधिकारी (महसूल) कुडाळ यांचेकडे दिनांक ०४/१०/२०२३ रोजी अर्ज पाठविणेत आला.
अर्जात नमूद केलेल्या तक्रारी बाबत मा. उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत अद्याप कोणतीही चौकशी होऊन श्रुती विनायक गावकर, बांदिवडे यांना आज पर्यंत न्याय मिळालेला नाही. म्हणून श्रुती विनायक गावकर, बांदिवडे नाईलाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसल्या आहेत. सोनल खरात यांनी सर्व माहिती विसंगत व खोटी सादर करुन, स्थानिक रहिवासी दाखला देतांना शासनाची दिशाभूल केली आहे. आणि तहसिलदार मालवण यांचेकडून स्थानिक रहिवासी दाखला घेतला आहे. असा आरोप श्रुती गांवकर यांनी केला आहे.