कासार्डे | निकेत पावसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात रविवारी दिवाळी पहाट २०२३ चे औचित्य साधून आश्रमातील आजो आजोबांना तथा ज्येष्ठांना नांदगांव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्ता तपसे यांनी अभ्यंगस्नान घातले व त्यांच्या सोबत फराळ केला. त्यांचा हा उपक्रम गेली ३ वर्षे सुरू आहे.
त्यांच्या या उपक्रमाची सर्व स्तरांतून प्रशंसा होत आहे . त्यांची वृद्धाश्रमात दिवाळी साजरी करण्याची तिसरी वेळ आहे. डॉ. दत्ता तपसे हे आश्रमातील सर्व आजी आजोबांची मोफत शिबीरे राबवून आरोग्याचीही काळजी घेतात. यावर्षीही त्यांनी दिवाळीच्या पहिल्या दिवशी दिविजा वृध्दाश्रमातील आजोबांना पहिली आंघोळ घातली. त्यांची ही सामाजिकता विविध उपक्रमांद्वारे अनेकवेळा दाखविली आहे.
यावेळी नांदगांव सरपंच रविराज मोरजकर, कणकवली खरेदी विक्री संघांचे संचालक पंढरी वायंगनकर, आश्रमाचे सचिव संदेश शेट्ये, सायली तांबे, दशरथ पाटील व इतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी संदेश शेट्ये यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.