तौक्ते वादळाने झालेल्या नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात कृषी अधिकारी टाळाटाळ करत असल्याचा आरोप.
कणकवली | उमेश परब : तौक्ते वादळाने कणकवली तालुक्यात नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना भरपाई रक्कम केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली परंतु कणकवली तालुका कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे दोन महिने होऊन देखील पूर्ण करण्यात आले नसल्याने भाजपा पदाधिकारी आक्रमक झाले. भाजपा पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय कृषी अधिकारी तथा तालुका कृषी अधिकारी शिवाजी हजारे यांना प्रश्न करत धारेवर धरले. यावेळी श्री हजारे यांनी त्यांना तलाठ्यांचे सहकार्य मिळत नसल्याची कारणे सांगत आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला.
भाजपाच्या शिष्टमंडळाने याबाबत थेट तहसीलदारांची भेट घेत ही बाब त्यांच्या निदर्शनास आणली. यावेळी श्री हजारे यांना तहसीलदार कार्यालयात बोलावून घेत कुठले तलाठी सहकार्य करत नाही ते सांगा असे सांगितले. दोन महिने झाले तरी तौक्ते वादळाच्या भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाहीत. अद्याप कृषी विभागाचे पंचनामे पूर्ण का झाले नाही? शेतकऱ्यांकडून काही आर्थिक हीतसंबंध जपण्यासाठीच तुम्ही पंचनामे पूर्ण करत नाहीत का? अशाप्रकारे भाजपा पदाधिकार्यांनी विविध प्रश्नांचा मारा करत कृषी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच थातुर मातुर कारणे न देता शेतकऱ्यांच्या प्रश्नांना गंभीरतेने न पहाणार्या अशा बेजबाबदार कृषी अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे अशी भूमिका घेत भाजपा पदाधिकाऱ्यांनी श्री हजारे यांच्या विरोधात तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठवा व यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी भाजपा शिष्टमंडळाने केली. त्यावर तहसीलदार आर.जे.पवार यांनी संबंधित कृषी अधिकाऱ्यांना चार जुलै च्या पत्रानुसार नोटीस बजावण्यात येईल असे स्पष्ट केले. तसेच कणकवली तालुक्यातील 211 हेक्टर शेतीचे ते वादळात नुकसान झाले. त्यातील केवळ 84 हेक्टर नुकसानीचे पंचनामे तहसील कार्यालयाला प्राप्त असल्याचे सांगण्यात आले. 84 हेक्टर नुकसानीची 46 लाख रक्कम शेतकऱ्यांच्या अकाउंट वर ट्रान्सफर करण्यासाठी ट्रेझरी मध्ये पाठविण्यात आल्याची माहिती तहसीलदार आर जे पवार यांनी दिली. तसेच 4 जुलै रोजी उर्वरित पंचनामे द्या अशा आशयाचे पत्र देखील तालुका कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले. मात्र त्यांच्याकडून अद्याप पंचनामे प्राप्त नसल्याची माहिती तहसीलदार श्री पवार यांनी भाजपा शिष्टमंडळाला दिली. यावेळी भाजपा शिष्टमंडळा कडून तालुका कृषी अधिकारी हजारे यांना अक्षरशः धारेवर धरत त्यांची बोलती बंद केली.
यावेळी तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री, प.स. सदस्य गणेश तांबे, नगरसेवक शिशिर परुळेकर, भाजपा प्रसिद्धी प्रमुख बबलू सावंत, भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस संदीप मेस्त्री,असलदे सरपंच पंढरी वायगणकर, शहराध्यक्ष अण्णा कोदे, प्रदीप गावडे, बाळा पाटील, संतोष पुजारे, साहिल शिरवडेकर आदी उपस्थित होते.