मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मनसे मालवण शहरचे माजी शहर अध्यक्ष विशाल ओटवणेकर यांनी परप्रांतीयांच्या वाढत्या संख्येबद्दल चिंता व्यक्त करुन त्यांना व त्यांना पसरवू पहाणार्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे व राज्य सरचिटणीस परशुराम उर्फ जिजी उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मनसे’ पद्धतीने हाताळले जाईल असा इशारा दिला आहे. माध्यमांना दिलेल्या प्रसिद्धी संदेशात मनसे माजी शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर यांनी सांगितले की सध्या मालवणात नवनवीन चेहरे दिसायचे प्रमाण वाढलेले आहे. हे लोक नेमके कोण, कुठले, कशासाठी आलेत याची झाडाझडती आता मनसे घेईलच परंतु त्यापूर्वी त्यांना ज्यांनी इथे आणले आहे त्यांनी रितसर मालवण पोलिस स्टेशनमध्ये या परप्रांतीय लोकांची वैयक्तिक माहिती, इथे येण्याचा उद्देश व पोलिसांची रितसर परवानगी घेणे अत्यावश्यक आहे. आगामी काळात सणासुदीत व धकाधकीत हेच अनोळखी चेहरे गुन्हा व घातपाताचे कारण ठरू शकतात त्यामुळे हे काही रितसर प्रोटोकॉल पाळायलाच हवेत असे विशाल ओटवणेकर यांनी नमूद केले आहे.
कोणीही विना माहितीचा संशयास्पद आढळला तर त्याला मनसे मालवण शहर, मनविसे व मनसे महिला कार्यकर्त्यांमार्फत ‘मनसे’ पद्धतीने हाताळून पोलिसांच्या स्वाधीन केले जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे. आता अवैध परप्रांतीय लोकांना सहन करायची मराठी माणसाची सर्वतोपरी सहनशक्ती संपलेली असल्याचेही मनसे माजी शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर यांनी स्पष्ट केले आहे.