आमदार वैभव नाईक यांनी पावसाळी अधिवेशनात मांडलेल्या तारांकित प्रश्नावरून झाली कारवाई ; एकूण ३० लाख ५९ हजार १७६ रु चा अपहार..!
आमदार वैभव नाईक यांच्या वतीने आमदार राजन साळवी यांनी या प्रश्नावर वेधले होते सभागृहाचे लक्ष.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या बांदिवडे बुद्रुक ग्रामपंचायत व बांदिवडे खुर्द कोईळ या दोन्ही ग्रामपंचायतचे ग्रामसेवक हेमंत बलराम तांबे यांनी या दोन्ही ग्रामपंचायतच्या आर्थिक बाबीत एकूण ३० लाख ५९ हजार १७६ रु चा अपहार केल्याचे चौकशीत आढळून आले होते. या ग्रामसेवकावर कारवाई होण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी पावसाळी अधिवेशनात याबाबत तारांकित प्रश्न मांडला होता. आमदार वैभव नाईक यांच्या वतीने आमदार राजन साळवी यांनी या प्रश्नावर सभागृहाचे लक्ष वेधले होते. त्यानुसार या प्रकरणाची चौकशी होऊन ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी प्रभाकर जाधव यांनी आचरा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादिनुसार दोन्ही ग्रा. पं. चे तत्कालीन ग्रामसेवक हेमंत बलराम तांबे व तत्कालीन बांदिवडे बुद्रुक सरपंच प्रविणा प्रमोद प्रभू, तत्कालीन बांदिवडे खुर्द कोईळ सरपंच रमेश आत्माराम तोरसकर यांच्यावर कलम ४२० व अन्य कलमान्वये अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खोटी कागदपत्रे वापरून खोटे दस्तऐवज बनवून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाच्या पर्यायाने ग्रामपंचायतच्या वेगवेगळ्या ग्रामनिधीतून दोन्ही ग्राम पंचायतचे तत्कालीन ग्रामसेवक हेमंत बलराम तांबे व तत्कालीन बांदिवडे बुद्रुक सरपंच प्रविणा प्रमोद प्रभू, तत्कालीन बांदिवडे खुर्द कोईळ सरपंच रमेश आत्माराम तोरसकर यांनी आर्थिक अपहार केला आहे. त्यानुसार तत्कालीन दोन्ही सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करून या गुन्ह्याचा तपास आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश देसाई करत आहेत.