सावंतवाडी | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माजी आमदार व मनसे राज्य सरचिटणीस परशुराम उर्फ जिजी उपरकर यांनी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कार्यपध्दतीवर टीका केली आहे. मतदारसंघातील मागील अनेक वर्षांचे विकासाचे प्रश्न प्रलंबित असताना देखील मंत्री दीपक केसरकरांनी आता निवडणूक यासमोर ठेवून मोठ्या मोठ्या प्रकल्पाच्या घोषणा करीत एक प्रकारे मतदारसंघातील नागरिकांना ‘उल्लू’ बनविण्याचे काम सुरू केले असल्याचा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज येथे केला. दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे फक्त स्वतःचे प्रकल्प व स्वतःच्या जमीनी घेण्यात व्यस्त असल्याचा आरोप देखील उपरकर यांनी यावेळी केला. काल सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत ते संवाद साधत होते.
यावेळी जिजी उपरकर म्हणाले की शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर जिल्ह्याचे ५ वर्षे पालकमंत्री असताना मतदारसंघातील विकास करू शकले नाहीत. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सारख्या प्रश्नावर देखील राजकारण करतात. तसेच टर्मिनसवर देखील राजकारण केसरकर यांनी केले. त्यामुळे केसरकर हे फक्त राजकारण करून कुठेतरी लोकांना मी काम करतोय’ असे दाखवायचा प्रयत्न दिखावा करत असल्याचा आरोप मनसेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी मंत्री केसरकर यांच्यावर केला. प्रत्यक्ष जिल्ह्याच्या तिजोरीच्या चाव्या तुमच्या हातात असताना देखील तुमच्या मतदारसंघातील तुम्ही विकास करू शकला नाहीत आणि तुम्ही राज्याचे शिक्षणमंत्री असताना देखील जिल्ह्यातील तरुणांना नोकऱ्या मिळू शकल्या नाहीत, तर काय करायचे आहे ते मंत्रीपद आणि काय करायचे ती आमदारकी, असा टोला देखील त्यांनी यावेळी केसरकर यांना लागावला.
यावेळी माजी शहराध्यक्ष तथा मनविसे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, मनसे रस्ते साधन सुविधा व आस्थापना अभय देसाई, मनविसे जिल्हा सचिव निलेश देसाई, स्वप्नील जाधव, विजय जांभळे, सुनील नाईक, संदेश सावंत, रमेश शेळके, अभिषेक पेडणेकर, प्रणित टाळकर, विशाल गांवकर नितीन गांवकर, ओंकार गांवकर, अतुल गांवकर ज्ञानेश्वर नाईक आदी उपस्थित होते.