मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ विभागाच्या बांदा – कुडाळ – बोरीवली या स्लीपर प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस चालकाच्या जागेवर बसून राज्य परिवहन मंडळाची बस चालवल्या प्रकरणी आमदार वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा व कारवाई व्हावी अशी मागणी कुडाळ भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कुडाळ पोलिसांकडे केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी कुडाळ पोलीस निरीक्षकांकडे सुपूर्त केले आहे.
यावेळी भाजपाचे ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल, कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बंड्या सावंत, जिल्हा चिटणीस विनायक राणे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य दिपक नारकर, मोहन सावंत, निलेश तेंडुलकर, नित्यानंद कांदळगावकर, पप्या तवटे, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष रूपेश कानडे, आनंद शिरवलकर, मार्जी नगरसेवक सुनिल बांदेकर, सरचिटणीस राजेश प्रभु शक्तिकेंद्र प्रमुख नागेश परब, ऋणाल कुंभार, नागेश आईर,
प्रकाश पावसकर उपस्थितीत होते
या निवेदनात असे म्हटले आहे की, कुडाळ आगाराच्या बांदा – बोरिवली या स्लीपर कोच प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसच्या लोकार्पणा दरम्यान कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी स्वतः कडे प्रवासी वाहतुकीचा कोणताही अधिकृत परवाना नसताना तसेच या नवीन प्रकारच्या बसेस चालवण्याचे कोणतेही प्रशिक्षण नसताना ही बस चालवून प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण केला . तसेच शासकीय मालमत्तेला धोका पोहोचेल असे कृत्य केले आहे. कुडाळ आगाराची प्रवाशांनी भरलेली एस. टी. चालवल्या प्रकरणी आमदार वैभव नाईक, त्यांना ती बस चालवण्यासाठी परवानगी देणारे राज्य परिवहन विभाग सिंधुदुर्गचे विभाग नियंत्रक अभिजीत पाटील, विभागीय वाहतूक अधिकारी डॉ. विक्रम देशमुख आणि इतर अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी कुडाळ भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कुडाळ पोलीस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.