मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे गांवा लगतच्या बांदिवडे बाजारवाडी येथील मंगल अनंत मांजरेकर यांच्या राहत्या घराचे छपर गुरुवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास अचानक संपूर्ण कोसळून सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. याच घरात २१ दिवसाच्या गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती परंतु घरात असलेल्या महिला आणि ही गणेश मूर्तीला कोणताही धक्का बसला नाही. संपूर्ण गणेश मूर्तीच्या आजू बाजूला आणि घरात असणाऱ्या महिलांच्या बाजूला हे छप्पर पडूनही सुदैवाने कोणती हानी झाली नाही ही एक प्रकारे गणरायाचीच कृपा असावी असे बोलले जात होते. बांदिवडे सरपंच आशु मयेकर आणि ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल मुणगेकर आणि वाडीतील ग्रामस्थांनी घटनास्थळी भेट देऊन यावेळी सहकार्य केले.
बांदिवडे मळावाडी येथील मंगल मांजरेकर यांच्या राहत्या घरात २१ दिवसाच्या गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. गुरुवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास या घराचे छप्पर अचानक संपूर्णपणे कोसळून मोठा आवाज झाला. यावेळी जेवण करण्याच्या रूममध्ये घरातील महिला आणि शेजारील महिला बसल्या होत्या. तर याच घरातील एक ज्येष्ठ महिला हॉलमध्ये गणेश मूर्तीच्या बाजूला खुर्ची वरती बसली होती. अचानक मोठा आवाज करून घराच्या छपराचे सर्व भाग या सर्व माणसांच्या आजूबाजूला आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती त्या गणेश मूर्तीच्या असणाऱ्या टेबलाच्या बाजूने छप्पर कोसळले. फक्त गणेश मूर्तीच्या वरती असणारे छप्पर एवढेच शिल्लक होते. ही एक प्रकारे गणरायाची कृपा असावी असे बोलले जात होते. यानंतर त्वरितच येथील ग्रामस्थांनी श्री गणरायाचे विसर्जन केले.
एवढी मोठी दुर्घटना होऊ नही घरात असणाऱ्या सर्व महिला सुरक्षित होत्या. एकाही महिलेला या छप्पर कोसळल्यामुळे हानी पोचले नाही. या घटनेची खबर मिळताच बांदींवडे ग्रामपंचायत सरपंच आशू मयेकर, ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल मुणगेकर, लिपिक परब तसेच वाडीतील जेष्ठ ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते यांनी घटनास्थळी भेट देऊन या घरातील माणसांना धीर दिला. तसेच तातडीने मदत कार्यालाही सुरुवात केली.
याच घरात दैनिक तरुण भारत चे एजंट अजय पडवळ हे आपल्या परिवारासाठी राहत असून तेसुद्धा या घटनेमुळे घाबरलेले आहेत. हे कुटुंब अतिशय गरीब असून अचानक घराचे छप्पर कोसळल्यामुळे या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भर पावसात कोसळलेले छप्पर कसे दुरुस्त करावे हा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर आज पडला आहे सुमारे अडीच लाख रुपये खर्च करून त्वरित छप्पर दुरुस्त करणे हे या कुटुंबाला कठीण आहे. समाजातील दानशूर माणसानी या कुटुंबासाठी मदत करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांमधून होत आहे. याबाबत सरपंच आशु मयेकर यांनी येथील स्थानिक आमदार वैभव नाईक आणि प्रशासनाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली आहे.