मुंबई | ब्युरो न्यूज : यंदाच्या गणेशोत्सव सणा निमित्त गावाकडे धाव घेणाऱ्या कोकणवासीयांची प्रवास भाड्यात लूट होऊ नये, यासाठी नवी मुंबई आरटीओने दरपत्रक प्रसिद्ध केले आहे. खासगी ट्रॅव्हल्स चालकांना त्याप्रमाणे प्रवासभाडे आकारण्याचे सूचित करण्यात आले आहे. यानंतरही त्यापेक्षा अधिक भाडे आकारले तर कारवाईला सामोरे जावे लागेल, असेही सूचित करण्यात आले आहे.
विविध मार्गांवर नवी मुंबईसह लगतच्या शहरातून प्रवासी वाहतूक करणारी वाहने धावत असतात. त्यात एसटीसह खासगी ट्रॅव्हल्सचा मोठा समावेश आहे. बहुतेक कोकणवासी रेल्वेने गावाकडे धाव घेतात. परंतु, रेल्वेचे तिकीट कन्फर्म न झाल्यास त्यांना खासगी बसचा पर्याय वापरावा लागत असतो. अशावेळी ट्रॅव्हल्स चालकांकडून वाढीव दर आकारला जाऊ नये हा उद्देश आर टी ओ प्रशासनाने स्पष्ट केला आहे. सर्वसामान्यांची होणारी लूट टाळण्यासाठी आरटीओकडे तक्रारी येत असतात. आता तक्रारीनुसार चौकशी करून कारवाई करण्यात येईल अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.