मालवण | संपादकीय विशेष : “धूप में निकलो और घटाओं में नहा कर तो देखो , ज़िंदगी क्या है किताबों को हटा कर तो देखो……!” शायरीच्या या ओळी खूप काही सांगतात…! पूर्वी संतांचे अभंग हे लोकजागर करायचे माध्यम होते असे म्हणले जाते तर त्याचवेळी पुस्तके ही आत्मजागर करतात हे पुढे पुढे संतांनीच समजवून दिले. पुस्तकाच्या एकेक पानासोबत मानवाला आपले गत,वर्तमान आणि ठरवलेच तर भावी आयुष्यही उलगडू शकते अशी असते पुस्तकाची महती…! आधुनिक काळात सोयी सुखसोयी आणि माहिती व तंत्रज्ञान भरपूर असले तरी त्याचे प्रोसेसिंग म्हणजे ‘ हे कसे घडते ‘ हा प्रश्न केवळ पुस्तकेच उलगडू शकतात म्हणून अगदी महागातल्या महाग यंत्र व उपकरणातील खोक्यामध्ये एक छोटी मार्गदर्शन करणारी पुस्तिका असते….तिला आपण मॅन्युअल म्हणतो. आज पुस्तकांची वानवा नाहीय किंवा लेखांचीही नाहीय परंतु ‘पुस्तक कसे वाचावे ….किंवा वाचन कसे करावे व त्यातील सार कसे उलगडून स्वतःचे अध्यात्म स्वतः शोधावे हे दाखवणार्या मार्गदर्शकांची नक्कीच कमतरता आहे..म्हणूनच देवाने आजही अस्सल ग्रंथपाल समाजात सजीव राखले आहेत.
पुस्तक कसे हाताळावे हे समजावणारे ग्रंथपाल पुढील सुभाषित तथा पुस्तकाचे आत्मवृत्त हे त्यांचा कानमंत्र म्हणून जरुर सांगतात , ” तैलाद् रक्षेत् जलाद् रक्षेत् रक्षेत् शिथिल बंधनात |
मूर्ख हस्ते न दातव्यं एवं वदति पुस्तकम् ||..” तेल,पाणी व सैल बांधणीपासून पुस्तके राखा….जपा आणि मूर्खांच्या हाती लागू देऊ नका…पण ग्रंथपाल हेही समजवतो की पुस्तक वाचलेला व वाचायला शिकलेला कधीच मूर्ख असत नाही.
राज्यात व खासकरुन शालेय स्तरावर वाचना प्रेरणा दिन साजरा झालाय. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसानिमित्त हा जागर व उपक्रम साजरा केला जातो. आजही शालेय ग्रंथपालही हा माणुस असा असतो की जो ही प्रेरणा गेली अथकपणे शालेय स्तरावरुन देता देता स्वतः ग्रंथसजगता आणि ग्रंथमहतीचा सर्वतोपरी प्रसार अगदी निःस्मीमपणे करतो. शालेय विद्यार्थ्यांना वाचनासोबतच त्यातील मनातल्या मनात येणार्या तरंगांना वक्तृत्वात कसे सादर करावे हाही एक वाचनपश्चात टप्पा काही ग्रंथपाल अगदी सुसंस्कृत सुव्यवस्थेने शिकवतात..समजावतात .
तो असतो शालेय ग्रंथपाल! …आणि त्या जबाबदारीतील भानाच्या अशा शब्द गुलाब पाकळ्या तो अगदी नकळत शालेय विद्यार्थ्यांच्या बालमनाच्या पुस्तकात जपायला लावतो…अगदी आग्रहाने..! कुठल्या विद्यार्थ्याने काय वाचावे हा अक्षरशः वाचनवैद्याचा अभ्यासकच जणू…. ! असा वाचन शिकवणारा, समजावणारा व समुपदेशणारा माणुस तथा ग्रंथपाल ह्या व्यक्ती अभंग ग्रंथ व ग्रंथ अभंगच म्हणता येतील…