दिखाऊपणा केलेल्या शेखर मुळम यांनी दिल्या घरी सुखी रहावे असाही लगावला टोला..!
कुडाळ | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातल्या नेरूर गणेशवाडी मध्ये दोन दिवसांपूर्वी भाजप मध्ये शेखर मुळम आणि कार्यकर्त्यांनी असा जो प्रवेश घेतला तो फक्त नेरूर भाजप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा माजी खासदार निलेश राणे यांच्याकडून पाठ थोपटून घेण्यासाठी केलेला विनाकारण दिखाऊपणा आहे. शेखर मुळम यांनी भाजप पक्षामध्ये प्रवेश वैयक्तिक स्वार्थासाठी केलेला आहे. कारण शेखर मुळम दोन वर्षापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात काही कामच करत नव्हते. ते आता झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनल सोबत फिरत होते. त्यामुळे त्यांचा उ. बा. ठा. शिवसेना पक्षाशी त्यांचा काहीच संबंध नाही. पण त्यांच्यासोबत जे प्रवेश दाखवले आहेत ते मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाचे एकनिष्ठ शिवसैनिक आहेत व ते उ. बा. ठा. शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ राहणार असल्याचे त्यांच्याकडून सांगितले गेले आहे.
खासदार विनायक राऊत , आमदार वैभव नाईक, माजी सरपंच शेखर गावडे यांच्यामार्फत गणेशवाडी लगतचा होणारा कुडाळ नगरपंचायत यांचा कचरा प्रकल्प हद्दपार करणे, एमआयडीसी मार्फत जलजीवन अंतर्गत प्रत्येक घरास पाणीपुरवठा करणे, गणेशवाडी साठी एमआयडीसी कडून स्मशानभूमी साठी जागा उपलब्ध करून देणे व बांधणे, नेरूर चव्हाठा, साईचे टेंब, गणेशवाडी माड्याचीवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे या सारखी कामे केल्यामुळे गणेशवाडीतील ग्रामस्थ उ. बा.ठा. शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ आहेत. त्यामुळे शेखर मुळम यांचा भाजप प्रवेश झाल्याने नेरूर मधील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला काहीही फरक पडणार नाही.
शेखर मुळम यांनी आपण गेल्या घरी सुखी रहावे असाही टोला ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर जयवंत गावडे यांनी लगावला.