मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात मसुरे भरतगड येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या समारोपाचे औचित्य साधून ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियाना अंतर्गत भरतगड ग्राहक सहकारी संस्थेच्या वतीने मसुरे येथील माजी सैनिक आणि शहीद सैनिकांच्या वीर पत्नींचा गौरव समारंभ या संस्थेचे अध्यक्ष अजयकुमार प्रभूगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या सभागृहात संपन्न झाला.
देशाचे रक्षण हाच सैनिकाचा आत्मा असतो. आणि देश रक्षणासाठी सैनिक जीवाची बाजी लावत असतो. आमच्यासारख्या सैनिकांना देश सेवा करायची संधी मिळाली हे आम्ही आमचं भाग्य समजतो. मसुरे येथील भरतगड ग्राहक सहकारी संस्थेने आम्हा माजी सैनिकांचा जो आज मान सन्मान केला याबद्दल या संस्थेच्या अनोख्या उपक्रमाचे कौतुक करावे तेवढेच थोडे आहे असे प्रतिपादन मसुरे येथील माजी सैनिक दीपक बागवे यांनी सत्कारास उत्तर देताना मसुरे येथे केले .
यावेळी व्यासपीठावर मर्डे सरपंच संदीप हडकर, माजी जी प अध्यक्ष संग्राम प्रभूगांवकर, माजी सैनिक धनंजय सावंत अशोक मोरे, दीपक बागवे, वीर पत्नी श्रीमती कल्पना दूखंडे, प्रकाश चव्हाण, रवींद्र दुखंडे, महेश दुखंडे,विलास राणे, सोमाजी परब, पुरुषोत्तम शिंगरे, जगदीश चव्हाण, दिगंबर येसजी, वासुदेव पाटील, नितीन नाईक, वीरेश तोंडवळकर, बटल्या भोगले, मोनिका दुखंडे, हेमलता दुखंडे, किशोर देऊलकर, शकिरा शेख, रघुनाथ ठाकूर, सुलक्षणा परब, वसंत प्रभूगांवकर, तात्या हिंदळेकर, प्रकाश मोरे, सुरेश बागवे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी सैनिक दीपक बागवे, धनंजय सावंत, अशोक मोरे यांचा आणि माजी सैनिक कै.मोहन दुखंडे यांच्या वीरपत्नी कल्पना दुखंडे, कै. बिभीषण चव्हाण यांचे बंधू प्रकाश चव्हाण, कै. नारायण गावडे यांचे जावई संदीप हडकर, कै. बाबुराव राणे यांचे चिरंजीव विलास राणे, पुणे येथे असलेले मसुरे सुपुत्र माजी सैनिक श्री रवींद्र दुखंडे यांचे बंधू महेश दुखंडे यांचा या वेळी मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सैनिक अशोक मोरे, दीपक बागवे, धनंजय सावंत यांनी जीवाची बाजी लावून देशासाठी लढताना प्रत्यक्ष युद्धभूमीवरील अनेक थरारक प्रसंग उपस्थित ग्रामस्थांना सांगताना प्रत्येक श्रोत्याच्या चेहऱ्यावरती आनंदाश्रू आलेत. माजी सैनिक अशोक मोरे यांनी युद्धभूमीवर आपल्याला शत्रूची गोळी लागलेली असतानाही प्राणपणाने लढताना आपण आपल्या मायभूमीसाठी लढत आहोत याचाच आपल्याला सार्थ अभिमान असल्याचे यावेळी सत्कारास उत्तर देताना सांगितले. माजी जि प अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, मर्डे सरपंच संदीप हडकर, अजयकुमार प्रभूगांवकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. संस्थेच्या वतीने यावेळी येथील महिलांना दीप वाटण्यात आलेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश बागवे आणि आभार सोमाजी परब यांनी मानले.