मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी, मालवण वासियांना नगरपरिषदच्या वतीने देशभक्ती पर आवाहन केले आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी समारोपानिमित्त ‘माझी माती माझा देश’ या मोहिमेअंतर्गत ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीमध्ये पंचप्रण प्रतिज्ञा, वसुधा वंदन, शिलाफलकम (स्मारक), वीरोंको वदन, हर घर तिरंगा अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. ‘माझी माती माझा देश’ या मोहीमे अंतर्गत शासनाच्या सूचनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्था, सर्व शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालये, बचतगट यांनी काल ९ ऑगस्टला सकाळी १० वाजता प्रंचप्रण शपथ घेतली. या मोहिमेत सहभागी होऊन श्री. संतोष जिरगे, प्रशासक तथा मुख्याधिकारी व सर्व अधिकारी/ कर्मचारी यांनीही प्रंचप्रण शपथ घेतली. तसेच मालवण तहसिल कार्यालय, पोलीस ठाणे, पंचायत समिती, मत्स्य व्यवसाय विभाग सिंधुदुर्ग, स.का.पाटील सिंधुदुर्ग कॉलेज, जिल्हा परिषद धुरीवाडा शाळा, देऊळवाडा शाळा, रेवतळे शाळा, देसाई स्कूल, टोपीवाला हायस्कूल, कन्याशाळा, भंडारी हायस्कूल, रोझरी इंग्लिश स्कूल, जय गणेश स्कूल शिक्षक व विद्यार्थी विद्यार्थिनी, मालवण शहरातील सर्व बचतगट, सर्व सरकारी कार्यालयामधील अधिकारी, कर्मचारी यांनीही या मोहितेअंतर्गत पंचप्रण शपथ घेतली.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या औचित्याने ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत शासनाने सूचना दिलेल्या असून या निमित्त १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक नागरीकांनी आपले घरावर तिरंगा ध्वज फडकावावा असे आवाहन करण्यात आले आहे. मालवण पोस्ट ऑफीस, येथे या ठिकाणी रुपये २५/- शुल्क भरुन ‘तिरंगा’ उपलब्ध होणार आहे.

जास्तीत जास्त नागरीकांनी हर घर तिरंगा या उपक्रमात सहभागी व्हावे, असे देशभक्ती पर आवाहन मालवण नगरपरिषद प्रशासक तथा मुख्य अधिकारी संतोष जिरगे यांनी नगरपरीषदच्या वतीने केले आहे.