ब्युरो न्यूज : गुप्तधनच्या हव्यासा पोटी पोहाणे या नाशिक जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यातल्या अवघ्या ९ वर्षीय चिमुकल्याचा गळा चिरून खून करण्यात आला आहे. पोलीस तपासातून हा प्रकार ‘नरबळी’ असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलीसांनी चौघांना जेरबंद केले असून १ संशयित पसार आहे. ही काळीमा फासणारी सदरची घटना मालेगाव तालुक्यातील वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्याच्या हददीतील पोहाणे येथे घडली आहे.
कृष्णा अनिल सोनवणे (९) असे जीव गमावलेल्या चिमुकल्याचे नाव असून सर्वसामान्य शेतकरी परिवारातील होता.
उमाजी गुलाब मोरे (४२), रोमा बापू मोरे (२५), रमेश लक्ष्मण सोनवणे (२१), गणेश लक्ष्मण सोनवणे (१९, सर्व रा. पोहाणे, मांजरी नाला शिवार, ता. मालेगाव जि. नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून, लक्ष्मण नवल सोनवणे (४५) हा पसार आहे.
वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोहाणे येथील ९ वर्षांचा कृष्णा सोनवणे हा गेल्या १६ तारखेला शेतात खेळण्यासाठी गेला, तो परत आलाच नाही. त्यामुळे याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलिसात कृष्णाचे वडील अनिल सोनवणे यांच्या तक्रारीनुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच पाेहाणेच्या पोलीस पाटीलांनी १८ तारखेला मांजरे नाला परिसरातील शेतातून दुर्गंधीयुक्त वास येत असल्याचे पाेलिसांना कळविले. त्यानुसार पाेलिस व तहसीलदारांसमक्ष उत्खनन केले असता मातीच्या ढिगार्याखाली पालथे परिस्थितीमध्ये लहान मुलाचा मृतदेह पुरण्यात आला होता. हा मृतदेह कृष्णाचा असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी धुळे शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.
दरम्यान, पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय अधिकारी मालेगाव ग्रामीण विभाग पुष्कराज सुर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी पोलिसांच्या हाती काही संशयास्पद वस्तू व श्वान पथकाने दाखविलेल्या मार्गांवरून संशयित गावातीलच असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी तपास करीत चौघा संशयितांना शिताफीने अटक केली. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक मनोज पवार, उपनिरीक्षक अंकुश नवले, सहायक निरीक्षक देवेंद्र शिंदे, उपनिरीक्षक संदीप पाटील, अंमलदार चेतन संवत्सरकर, अंमलदार देवा गोविंद, सुभाष चोपडा, नरेंद्र कोळी, योगेश कोळी, विजय वाघ, नितीन सपकाळे, गौतम बोराळे, संतोष हजारे, कदम, संजय पवार, सूर्यवंशी, हिम्मत चव्हाण, बापू महाजन, निशा साळवे, बाचकर, रणजित सोळंके, गजानन कासार, महेंद्र पवार, किरण दुकळे यांनी केली आहे. अधीक्षक शहाजी उमाप यांनी या पथकाला १५ हजार रुपयांचे बक्षिस दिले आहे.
कृष्णा याचे अपहरण १६ जुलैला झाले होते तर १७ तारखेला सोमवती अमावस्या होती. कृष्णाच्या गळ्यावर चिरल्याच्या खुणा होत्या. त्यावरून सदरचा प्रकार नरबळीचाच असण्याची शक्यता होती. त्यादृष्टिकोनातून पोलिसांनी तपास सुरू केला असता, कृष्णा शेवटचा संशयित गणेश सोनवणे याच्यासमवेत दिसल्याचे अनेकांनी सांगितले. त्यावरून संशयित गणेशला ताब्यात घेतल्यानंतर खुनाची उकल होत गेली. संशयित रमेश सोनवणे यांच्या अंगात येते, असे तो सांगतो. परिसरात गुप्तधन असून, त्यासाठी नरबळी देण्याचे त्याने सांगितले होते. त्यानुसार मुख्य संशयित लक्ष्मण सोनवणे याने नरबळीचा कट रचला. गणेश याने त्याच्या ओळखीतून कृष्णासमवेत खेळताना त्याला विश्वासात घेऊन त्याचे अपहरण केले आणि त्यानंतर अमावस्येला त्याचा गळा चिरून खून करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या संशयितांनी खुनाची कबुली दिली आहे. संशयित हे एकमेकांचे नातलग आहेत.
ग्रामीण भागातील आदिवासी समाजात अद्यापही अंधश्रद्धा असल्याचे या घटनेतून समोर आले आहे. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समिती व पोलिस संयुक्तपणे ग्रामीण भागासह आदिवासी भागात जनजागृतीपर प्रबोधनात्मक उपक्रम राबवतील. जेणेकरून अंधश्रद्धेला चाप लावता येईल असे शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण यांनी सांगितले आहे.