कणकवली | गणेश चव्हाण : एखादी व्यक्ती मयत झाल्यावर बाराव्या विधी कार्यक्रमाला सुत ऐवजी शक्य असल्यास त्या मयतांच्या वारसाला पाकीटातून शक्य होईल तेवढी किंवा विधींसाठी जो खर्च येईल त्याला हातभार म्हणून यथाशक्ती रक्कम गरजवंताला द्यावी तसेच जी रक्कम त्या मयत व्यक्तीच्या आजारपणाला खर्च झाली असेल तर किंवा दिवसकार्याच्या खर्चासाठी उपयोगात येईल. केवळ नाभिकच नव्हे तर इतर सर्व समाजाने देखील दुःखद प्रसंगी आपला खारीचा वाटा उचलून मृत व्यक्तिच्या घरच्यांसाठी खारीचा वाटा उचलून मदत करावी असे विनंतीपूर्वक आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर यांनी नाभिक समाजाच्या वतीने प्रसिध्दीस केले आहे.
एखाद्या व्यक्तिच्या निधनानंतर त्या मयत व्यक्तिचे पारंपारीक विधी केले जातात. बाराव्या दिवशी पिंडदान व सुत टाकणे हे विधी केले जातात. या कार्यक्रमाला नातेवाईक व सर्व समाजबंधु सुत आणतात. सुत म्हणजे त्या मयत व्यक्तिचे दिवसकार्य करणार्या, वारसाच्या अंगावर कपडे टाकणे (देणे) यासाठी आणलेल्या कपड्यांना सुत म्हणतात. हे सुत म्हणजेच कपडे त्याच घरातील लोकांनी वर्षभरांत वापरायचे असतात. हे सुत (कपडे ) एवढे असतात की ते न संपल्यामुळे त्याचा अयोग्य वापर होऊन नासाडी होते. त्या ऐवजी मुख्य नातेवाईकांनीच उदा. मामा, आत्त्या, भाचे व सासुरवाडी, अशा जवळच्या दोण चार नातेवाईंकांकडुन सुत घालणे व बाकी नातेवाईकांनी शक्य होईल तेवढी किंवा त्याच सुताला लागणारी रक्कम पाकीट मधुन त्या घरात देणे. म्हणजे त्या रक्कमेचा प्रसंगातील त्या गरीब किंवा गरजू कुटुंब योग्य विनियोग करु शकतात.
हा निर्णय अनिल अणावकर यांनी नाटळ ता. कणकवली व आचरा ता. मालवण येथे, तसेच शिवराम उर्फ बबन शेट्ये यांनी त्रिंबक ता. मालवण येथे उपस्थित नाभिक बांधवांना सांगितला. आता हा निर्णय सर्वश्रुत होत आहे. या निर्णयाची सर्व नाभिक बांधवांनी अंमल बजावणी करावी, असे जिल्हा नाभिक संघटनेच्या वतीने अणावकर यांनी विशेष आवाहन केले आहे.