मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या मुणगे येथील ‘एकता ग्राम संघ’ यांच्या वतीने दहावी बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला होता. एकता ग्राम संघ अंतर्गत मुणगे गावातील दहावी, बारावीच्या परीक्षेत श्री देवी भगवती हायस्कूल आणि कै.वीणा सुरेश बांदेकर ज्यू कॉलेज मधील उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाचशे रुपये आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाला यशस्विनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आनंद मालाडकर, माजी सरपंच सौ सायली बागवे, प्रभाग क्रमांक एक प्रभागसेविका सौ.रवीना मालाडकर, सौ.अंजली सावंत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मान करण्यात आला.
एकता ग्रामसंघाचा अध्यक्षा सौ.सविता रूपे, सचिव सौ.आरती सावंत,कोषाध्यक्ष सौ.हर्षदा मुणगेकर, लिपिका सौ.अनुजा कारेकर यांच्या आयोजनातून गुणगौरव सोहळा कार्यक्रमात विद्यार्थी,पालक, गुरुवर्य सर्वांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.