सरपंच शंकर नाईक यांचा स्वखर्चाने पुढाकार….!
बांदा : राकेश परब : आरोस बाजार हायस्कूल ते आरोस तिठा दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा घनदाट झुडपे वाढलेली हाेती. अनेक अपघात घडूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने सरपंच शंकर नाईक यांनी पुढाकार घेत ग्रामस्थांच्या सहकार्याने श्रमदानातून रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झुडपे कापली. त्यामुळे अपघाताचा काहीसा धोका निदान सद्यस्थितीत तरी टळला आहे.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आरोस गावामध्ये भाविकांची मोठी रहदारी असते. अपघाताच्या दृष्टीने सतर्क राहण्यासाठी झुडपे हटविणे आवश्यक होते. नागमोडी वळणे असलेल्या आरोस गावातील रस्त्याच्या दुतर्फा घनदाट झुडपे हाेती. अनेकदा झुडपांतून वाहनचालकांसमोर अचानक रानटी प्राणी येऊन अपघातही झालेत. परंतु प्रशासनाने मात्र झुडपे हटविण्याची तसदी सुद्धा घेतलेली नव्हती असे येथील नागरिकांनी सांगितले आहे. आरोस सरपंच शंकर नाईक यांनी पुढाकार घेत स्वखर्चाने आरोस बाजार हायस्कूल ते आरोस तिठा दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झुडपे श्रमदानातून ग्रामस्थांच्या सहकार्याने हटविली. त्यामुळे आरोस ग्रामस्थांसह ये-जा करणाऱ्या प्रवासी व वाहनचालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.