बांदा | राकेश परब : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा नुकत्याच सुरू झाल्या असून त्यास विद्यार्थ्यांचाही चांगला प्रतिसाद आहे. गेले दिड ते दोन वर्षांपासून शाळेपासून दूर असलेली मुले शाळेत जायला आतुरतेने बाहेर पडतायत. परंतु सावंतवाडी-पाडलोस मार्गे सातार्डा या बंद असलेल्या एसटीअभावी त्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रशासनाने सदर एसटीची सेवा तात्काळ सुरू करून विद्यार्थ्यांचे खासगी वाहनांसाठी होत असलेले आर्थिक नुकसान टाळावे, अशी मागणी पाडलोस माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष महेश कुबल यांनी केली आहे.
बाजारात जाण्यासाठी सावंतवाडी-पाडलोस मार्गे सातार्डा एसटी महत्त्वाची ठरते. त्यामुळे शेतकरी सावंतवाडी व बांदा बाजारपेठेत खरेदी-विक्री करण्यासाठी जातात तर विद्यार्थ्यांना सकाळच्या व संध्याकाळच्या सत्रात शाळेत ये-जा करण्यासाठी सदर एसटी सोयीस्कर ठरते. प्रशासनाने शाळा सुरू केल्या ही आनंदाची गोष्ट असून त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली सावंतवाडी-पाडलोस मार्गे सातार्डा एसटी बस सुरू करावी. कारण संध्याकाळच्या वेळी विद्यार्थ्यांना एसटी बस अभावी खाजगी वाहनांना पैसे देत घर गाठावे लागते परिणामी याचा अधिक भुर्दंड पालकांना सोसावा लागतो. याची दखल एसटी प्रशासनाने घेऊन विद्यार्थ्यांची प्रवासाची होत असलेली गैरसोय दूर करावी, अशी मागणी पाडलोस माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष महेश कुबल यांनी केली आहे.