स्टार…यार….कलाकारापेक्षाही वेगळा झुंजार पत्रकार ..!
मालवण | संपादकीय विशेष : सिंधुदुर्ग जिल्हा हा भारतीय पत्रकारितेचे उगमस्थान आहे. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकारितेतील आत्म्याची जाण देशातील सूज्ञ पत्रकारांना आहे.
बाळशास्त्री जांभेकर हे नांव तथा त्यांचा इतिहास न माहीत नसलेलेही काही बाह्यराज्यातील पत्रकारदेखिल माध्यमाचे काम प्रामाणिकपणाने करताना पाहिले की बाळशास्त्री जांभेकर हे तत्व निव्वळ मराठी किंवा जिल्ह्यापुरते मर्यादीत होऊन संपून गेलेले नसून ते आजही विविध नावांनी कार्यरत असल्याचे आपल्याला दिसून येते.
आपली सिंधुनगरी चॅनेलची ‘पत्ररत्न’ ही अशाच पत्रकरांविषयी माहिती देणारी मालिका आहे आणि आज त्यात ज्या पत्रकाराची ओळख करुन आपण घेतोय ते आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे गावचे श्री.झुंजार पेडणेकर.
1990 सालानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवावर्ग हा लेखणीची ताकद जाणू लागला होता. त्याहीपूर्वी श्रीकांत देसाईंसारखी खूप दर्जेदार नावे त्यांचे अथक शोधपत्रकारितेचे कार्य करतच होती. त्या नावांमध्ये विजय शेट्टी हे एक अल्ट्रा ग्लॅमरस धडाकेबाज व्यक्तिमत्व आणि नरेंद्र परब हे सोज्वळ परंतु ठाम तत्व समाजात अतिशय योग्यपणे माध्यमांमधून ‘फायर अँड आईस’ असे परिणाम साधत होते.प्रफुल्ल देसाईंसारखा हरहुन्नरी आणि कोणाच्याही पोटात शिरुन अगदी चालता बोलता स्वतःकडील ज्ञानाचे निरुपण आणि वाचनाचा आग्रह करुन नवोदीत पत्रकारांना पत्रकारितेतील बारकावे समजावू लागला होता.
आणि साल 2000 नंतर ह्या सर्व परिणाम व परिमाणांतून तोलून सावरुन निघणारी समतोल पत्रकार व्यक्तिमत्वे समाजाला मिळू लागली त्यातीलच एक म्हणजे स्टार….यार….कलाकारापेक्षाही वेगळे असे मसुरेचे श्री.झुंजार पेडणेकर .
गांव आणि शहर असले भेद झुंजारनी अक्षरशः त्यांच्या अस्सल पत्रकारिता इच्छेने नाहीसे केले.१९९५ साली मसुरे गावच्याच सुप्रसिद्ध बागवे हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलेल्या झुंजार यांनी मालवणमधील जी.पि.एम. म्हणजे पाॅलिटेक्निकमध्ये पुढील शिक्षण घेतले.
आज ते अध्यापनासोबत समाजाला पूरक असे पत्रकारितेचे काम जवळपास वीस वर्षे करत आलेले आहेत.
त्यांची पत्रकारिता ही जिल्ह्यातील राजकीय ज्ञान आणि सामाजिक, सांस्कृतिक माहिती एवढीच मर्यादित नक्कीच नाहीय तर त्याहीपलिकडे शेती,उद्योग व शैक्षणिक घडामोडींवरही त्यांची विशेष नजर आणि लेखणी कार्यरत असते.
केवळ बंबाळ करणारे शब्द आणि सळो की पळो करून सोडणारी दात ओठ खाऊन लिहीलेली वाक्ये म्हणजे पत्रकारिता हा समज गेली वीस वर्षे काहीजणांनी नकळत पेरायचे जाणते अजाणतेपणाचे प्रयत्न जरी केले असले तरिही सामाजिक शांती आणि निसर्गाधिष्ठीत प्रगतीचे आग्रही असणारे झुंजार पेडणेकर यांच्यासारख्या पत्रकारांनी आजही पत्रकारितेतील दर्पणकारीता सजीव राखलेली आहे.
डिजिटल युगात घिसाडघाई आणि ब्रेकिंगचा अट्टाहास ही व्यावसायिक गरज असतेच परंतु त्यावर अभ्यासू स्थैर्याची फुंकर घालण्याची पत्रकारितेतील सेवा झुंजार पेडणेकर बजावतायत.
त्यांना पत्रकारितेसाठी विविध सन्मान मिळाले आहेत याचे कदाचित आश्चर्य नाही पण त्यांच्या पत्रकारितेला व लेखणीला सामाजिक आपलेपण मिळते याचे सर्वांनाच कौतुक व अप्रूप असते.
समाज स्थीर ठेवून महिलांची सुरक्षा, समाजकल्याण,शेती,शिक्षण आणि अध्यात्म जपून पत्रकारिता व अध्यापन करणार्या आणि सर्वांगीण अध्यात्मिक स्थैर्य जपणार्या श्री.झुंजार पेडणेकर यांचा आज वाढदिवस. अशा ‘फायर अँड आईस ‘ तत्वाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा पत्रकारांना व पत्रकारिता क्षेत्राला नक्कीच आनंद आहे…व सार्थ अभिमानही.
आपली सिंधुनगरी चॅनेलच्या सर्व टीमतर्फे या मुक्त पत्रकाराला वाढदिवसानिमित्त भरपूर शुभेच्छा.