भाजपचे उद्योग व्यापार आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री.विजय केनवडेकर यांची स्पष्टोक्ती….
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांच्या पाठिशी भाजप ठाम उभा रहाणार असल्याचे आश्वासन …
मालवण | प्रतिनिधी : अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरु असलेली धाडसत्र मोहीम ही सर्वसामान्य व्यापाऱ्यांच्या मुळावर येणारी आहे. नवीन अधिनियमानुसार अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत घेण्यात येणारा परवान्यासाठी व्यवसायाचा जागेचे कागदपत्रे मागितली जात आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बरेच व्यापारी हे जुने भाडेकरू तत्वावर व्यापार करत आहेत.अशा व्यापाऱ्यांकडे घरमालकाची लिखित परवानगी घेऊन आल्याशिवाय परवाना दिला जाणारअसे सांगून परवाना दिला जात नाही.यामुळे बरेच व्यापारी परवाना पासून वंचित राहणार आहेत. जुन्या नियमानुसार व्यापाऱ्याने स्व हमीपत्र दिले की परवाना मिळत असे.स्व हमीपत्र चालत नसल्याने मूळ मालकाचे संमतीपत्र आणणे काही व्यापाऱ्यांना जिकिरीचे आहे काही व्यापाऱ्यांचे न्यायालयीन लढत सुरू असून त्याचा निकाल लागलेला नाही .अशा परिस्थितीत मालकाची संमती आणणे एक कठीण झाले आहे.यासंबंधी अन्नसुरक्षा अधिक्षक यांना निवेदन देऊन यासंबंधी नियम शिथील करून सर्वसामान्य व्यापाऱ्याला न्याय द्यावा अशी विनंती भारतीय जनता पार्टी उद्योग-व्यापार आघाडी तर्फे करण्यात येणार आहे. विनंती करूनही व्यापाऱ्यांवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर भाजपा तर्फे देण्यात येईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांच्या पाठीशी भाजपा खंबीरपणे उभा राहणार आहे.कोकणी मालाचे उत्पादक मसाल्याचे उत्पादक यांना लघु सूक्ष्म उद्योगाची नोंदणी कशी करावी व त्याचा फायदा उद्योगासाठी कसा करून घ्यावा याचे मार्गदर्शन शिबिर भाजपातर्फे लवकरच आयोजित करण्यात येत आहे. ज्या व्यापाऱ्यांना खादी ग्रामोद्योग तर्फे कर्ज पुरवठा घेतला आहे व त्याची सबसिडी येणे बाकी आहे व अशा व्यावसायिकांना सबसिडी मिळण्यासाठी मा. नारायण राणे केंद्रीय लघु सूक्ष्म व मध्यम उद्योग मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून मिळवून देण्यात येणार आहे असे भाजपचे उद्योग व्यापार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.