प्रतिभेच्या मंचापूर्वी आवश्यक मुलभूत घटकांवर प्रकाश टाकणारा आदर्श
मालवण | विशेष वृत्त : आजकाल कुठल्याही अस्सल प्रतिभेला संधी मिळायचे मंच, मैदाने आणि क्षेत्र जरुर निर्माण झाली आहेत. विविध स्तरांवर संधी मिळून त्याचे चिज केलेले अनेक प्रतिभावंत आणि होतकरु यांच्या संख्येचा आलेखही भारतात वरच्या दिशेने मान उंचावायला लागलेला आहे.
परंतु मोठे शहर असो,छोटे शहर असो किंवा ग्रामीण भागातदेखिल अजुनही सर्वच प्रतिभावंतांना संधीचे चिज करण्यासाठी आवश्यक साधने,साहित्य यांची उपलब्धता आहेच असे नाही.
खासकरुन क्रिकेटसारख्या खेळातील सर्व मुलभूत साहित्य व साधनांची एकहाती खरेदी ही सर्वच कुटुंबांना शक्य असते असे नाही. अशा परिस्थितीत कोणीतरी क्रीडा पालकत्व घेणे ही एक महत्वाची गरज असते आणि ते पालकत्व राजकीय वर्तुळातील आघाडीच्या मंडळींनी घेतले तर प्रतिभावंतांनमचा धैर्यवान बनण्याचा प्रवास खरेच सुकर होऊ शकतो.
याचेच एक आनंददायी उदाहरण सध्या मालवण कुडाळ मतदारसंघाच्या अठरा वर्षांखालील महिलांच्या क्रिकेट संघातील दमदार व हरहुन्नरी खेळाडुंना अनुभवायला मिळत आहे.
माजी खासदार तथा भाजप नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून मालवण कुडाळ विधानसभेच्या महिला क्रिकेट संघाला आर्थिक मदत मिळणार आहे. मालवण कुडाळ विधानसभेतील १८ वर्षांखालील महिला संघाच्या टेनिस क्रिकेट संघाची आंध्रप्रदेश येथे पुढील सामना खेळण्यासाठी निवड झाली आहे.
यातील सर्व खेळाडू मुली या सर्वसामान्य कुटुंबातील असून त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आंध्रप्रदेश येथे जाणे त्यांना शक्य होत नव्हते. अशावेळी मालवणचे नगरसेवक श्री. सुदेश आचरेकर व श्री. दीपक पाटकर यांनी भाजपा नेते माननीय निलेश राणे यांच्या कानापर्यंत हा मुद्दा नेल्यानंतर श्री.निलेश राणे यांनी महिला संघाच्या प्रवासाचा खर्च उचलून आर्थिक हातभार लावुन खिलाडूवृत्तीला व प्रतिभेला अनोखे प्रोत्साहन दिले आहे.
बुधवार दि.६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० वाजता शहर भाजपा कार्यालय येथे महिला टेनिस क्रिकेट संघाला आर्थिक मदत सुपूर्त करण्यात येणार आहे.यावेळी मा.सुदेश आचरेकर ,मा.गणेश कुशे गटनेते,मा.दीपक पाटकर व विजय केनवडेकर शहर प्रभारी ,श्री बाबा परब असे उपस्थित असणार असल्याची माहिती मालवण शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी परिपत्राद्वारे दिली आहे.
अशाप्रकारे प्रतिभेला साधनसुविधांची मदत करणारे लोकप्रतिनिधी व इतर उद्योजक यांच्यासाठी मालवण भाजपा व श्री.निलेश राणे यांनी क्रीडा पालकत्वाचा अनोखा आदर्श सुरु केलेला आहे.